उरण: ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडीवरून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तंबीच दिली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी काळजी घ्या, कायदा राबवण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबीच एकनाथ शिंदे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
एकनाथ शिंदे आज उरणच्या द्रोणगिरी येथे आले होते. यावेळी त्यांनी उरणच्या पार्किंग स्लॉटची पाहणी केली. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. वाहतूक कोंडी होता कामा नये. प्रवाशांना नाहक त्रास होऊ नये. त्यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील वाहतूक विभागाने अधिक काळजी घ्यावी, अशी सूचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक विभागाला केली.
वाहतूक कोंडीमुळे अनेकांना त्रास होत आहे. त्यासाठी आता आपण नवी मुंबई येथील जेएनपीटी, उरण व द्रोणागिरी या भागात जागेची पाहणी करत आहोत. जेएनपीटी उरण येथील 100 हेक्टर तर द्रोणागिरी या ठिकाणी 50 एकर जागा आहे. तसेच ठाणे खारेगाव, शहापूर, पालघर या भागात देखील पाहणी करत आहोत. लवकरात लवकर रायगड, ठाणे आणि पालघर या भागातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेले खड्डे दूर करू, असं त्यांनी सांगितलं.
ज्या ज्या पार्किंगमध्ये जाणार आहे त्या त्या यार्डातील गाड्यांचे स्टिकर कोड लावा. अवजड वाहने चुकणार नाहीत याची काळजी घ्या. जे चुकतील त्यांना दंड लावा. वाहतूक विभागाकडून अवजड वाहने वेळेत अडवू नका. सायंकाळी 8 नंतर वाहने या भागातून निघतात ते ठाणे नाशिक या भागात 11 पर्यंत पोहचतात, असं ते म्हणाले. सीएसएफची 45 हेक्टर जागा आहे. या ठिकाणी 2 हजार 830 अवजड वाहने उभे राहू शकतात. 8 तासाचे 100 रुपय आकारले जातात, असं सांगतानाच प्रत्येकाला ज्या यार्डात जायचे असेल त्या वाहनांना स्टिकर कोड लावा. म्हणजे 80 % वाहतूक कोंडी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 September 2021 https://t.co/TRbOrEU9Kh #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
संबंधित बातम्या:
पालघर, ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; हेल्पलाईन जारी
भयंकर! कोरोनाऐवजी रेबीजची लस दिली, कळव्यातील धक्कादायक प्रकार; नर्स निलंबित
(eknath shinde reaction on traffic jams in thane, navi mumbai)