नवी मुंबई : कोव्हिडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण सत्रांचे नियोजन केले जात आहे. 31 ऑगस्ट रोजी 20,500 डोसेस उपलब्ध झाल्याने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार 18 ते 30 वयोगटातील नागरिकांकरिता 83 लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे.
18 ते 30 वर्ष वयोगटाच्या नागरिकांकडून पहिल्या डोसबाबत विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार मोठ्या प्रमाणात डोसेस उपलब्ध झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची 4 रुग्णालये, इएसआयएस रुग्णालयातील जम्बो सेंटर, 21 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे, एपीएमसी मार्केटमधील 2 केंद्रे, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनिट याशिवाय बेलापूर विभागात 8, नेरुळ विभागात 11, वाशी विभागात 4, तुर्भे विभागात 5, कोपरखैरणे विभागात 9, घणसोली विभागात 8, ऐरोली विभागात 7, दिघा विभागात 2 अशाप्रकारे एकूण 83 लसीकरण केंद्रांवर 18 ते 30 या वयोगटातील 17 हजार 400 नागरिकांनी कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला आहे.
आठही विभागात कोव्हिड लसीकरण केंद्रे मोठ्या संख्येने असल्याने सर्व 83 ठिकाणी सुनियोजित पध्दतीने लसीकरण पार पडले. यापेक्षा अधिक प्रमाणात लस प्राप्त झाल्या तर 100 हून अधिक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करुन दररोज 50 हजार लसीचे डोस देण्याचे नियोजन नवी मुंबई महानगरपालिकेने केले असून तशाप्रकारची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.
शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात असून प्राप्त लसीचे डोस नागरिकांना लगेच उपलब्ध करुन देऊन पुढची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 8 लाख 56 हजार 444 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 3 लाख 37 हजार 756 नागरिक लसीचे दोन्ही डोस घेऊन संरक्षित झाले आहेत.
कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसच्या तारखेचे भान राखले जात असून त्यानुसार लसीकरणाची सत्रे आयोजित केली जात आहेत. तरी नागरिकांनी लसीकरण करुन घेऊन संरक्षित व्हावे तसेच लसीचा एक अथवा दोन्ही डोस घेतले तरी मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ ठेवणे ही आपली दैनंदिन जीवनाची सवय करुन घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवी मुंबईत झोपडपट्टी परिसरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतीचhttps://t.co/gemgVwh1C3#NaviMumbai #CoronaPatients #CoronaVirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2021
संबंधित बातम्या :
तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता मोहीम, कचराकुंड्या हटवून वृक्ष सुशोभिकरण