नवी मुंबई – नवी मुंबईत (Navi Mumbai) गेल्या 4 ते 5 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शहरात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. परंतु आज सकाळी पाच वाजता काही ठिकाणी रिमझिम पाऊस (Rain) पडल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नवी मुंबईकरांना पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी मान्सूनपुर्व पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिक सुध्दा पावसाची वाट पाहत आहेत. काल सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जोराचा पाऊस झाल्याने सांगली जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून सुटका झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकरी आता मशागतीच्या कामाला लागले आहेत. यंदा मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांची मशागतीसाठी धावपळ सुरू झाली आहे. सध्या शेतात नांगरणी, वखरणीची कामे सुरू झाली आहेत. पाऊस पडण्यापूर्वी शेत जमीन तयार ठेवावी लागते. त्यामुळे मशागतीची कामे देखील लवकर सुरू झाली आहेत. दरम्यान मृग नक्षत्रानंतर पेरणीला सुरुवात होते. गेल्या वर्षी खत आणि बियाणे महागले होते. यावर्षी तरी खत ,बियान्याच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. वादळी वाऱ्यासह सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरात पाऊस झाला. रात्रभर रिमझिम पाऊस सुरूच होता. विशेष म्हणजे जत या दुष्काळी भागात पावासाने जोराची हजेरी लावल्याने नागरिक एकदम खूष झाले आहेत. अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहून गेले आहेत.
बिरूळ ते खोजनवाडी रस्ता पाण्याने कातरून गेला आहे. अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती.