पेण: किरीट सोमय्या (Kirit somaiya) वेडे झाले आहेत. पागल आहेत ते. त्यांना स्वप्नातही त्यांना स्वत:ची बेनामी मालमत्ता दिसत आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली होती. राऊतांच्या या टीकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पलटवार केला आहे. होय, आहे मी ध्येयवेडा. सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आणि राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी ध्येयवेडा व्हावे लागले तर होईल ध्येयवेडा, असा पलटवार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या कोर्लई गावाकडे निघाले होते. त्यापूर्वी पेणमध्ये भाजपचे आमदार रवी पाटील (mla ravi patil) यांच्या घरी ते उतरले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूरही उपस्थित होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी आपण ध्येयवेडे आहोत, असं सांगत राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.
मी ठाकरे सरकारच्या 18 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. शिवसेनेच्या खासदार भावना गवळीचा पार्टनर जेलमध्ये गेलाय. आनंद अडसूळांच्या नावाने वॉरंट आहे. अनिल परब यांचा रिसोर्ट बेकायदेशीर ठरला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. प्रताप सरनाईक खोटं बोलत होते. त्यांना सरकारने टॅक्स माफ केला आहे. हसन मुश्रीफांच्या जावयाच्या बेनामी कंपनीला दिलेलं 1500 कोटीचं दिलेलं कंत्राट रद्द झालं आहे. अनिल देशमुख आत आहेत. म्हणजे मी जे बोलत होतो ते सिद्ध होत आहे. वेडं झाल्याशिवाय हे काम होत नाही. मी जर ध्येयवेडा असेल तर साडेबारा कोटी जनतेसाठी ध्येयवेडा व्हायला तयार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हे 19 बंगले विकत घेतले होते. रश्मी ठाकरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आले होते. बंगले नाहीत असं म्हणत असतील तर वाईट वाटते. प्रशांत ठाकूर शेट आहेत. प्रशांत भाऊ तुम्ही बायकोच्या नावाने बंगला बांधलाय? असा सवाल करतानाच जर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची चोरी होत असेल तर ते बंगले शोधून काढणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्हा दोन आमदारांची जबाबदारी आहे. जावई म्हणून माझी जबाबदारी आहे. त्या बंगल्यांचं काय झालं? याची विचारणा राज्यपालांना करणार आहोत. राज्यपालांना भेटून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे 19 बंगले चोरीला गेले त्याचं काय झालं? त्याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी भाजपचे आमदार रवी पाटील आणि प्रशांत ठाकूर यांना डीजीला पत्रं लिहण्याची सूचना केली. या प्रकरणी डीजींना पत्रं लिहा. या प्रकरणाची तपासाची करण्याची मागणी करा. गरज पडली तर सीबीआयची मदत घ्या. पण या बंगल्याचं अस्तित्व नाहीत असं सांगून सरपंच खोटं बोलत आहे हे उघड करा. एक तर बंगले आहेत. पण सरपंच दुसरीच जागा दाखवत आहेत. सरपंच खोटें बोलत आहेत किंवा बंगले गायब झाले आहेत. याचा तपास झालाच पाहिजे. हा महाराष्ट्रातील अस्मितेचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी