नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा अजूनही तापलेलाच आहे. नवी मुंबई, ठाणे ,पालघर पासून उरणपर्यंत जवळपास 500 पेक्षा अधिक भूमिपुत्रांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. मात्र, तरीही आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच होणार असल्याचे आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी स्पष्ट केलंय. मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करून आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र, आंदोलनातील सामाजिक संघटनांनी संपूर्ण पोलीस फाटा हा आमच्या सहकार्यासाठी आणि योग्यरीतीने आंदोलन पार पडावे यासाठी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे 24 जूनच्या आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, असं स्पष्ट करण्यात आलं (Know the stand of Protester demanding name of D B Patil to Navi Mumbai airport).
आंदोलकांना अडवलं तर पोलिसांना सहकार्य करून त्याच ठिकाणी सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात येईल. कारण आमची लढाई प्रशासनाशी नसून सरकारशी असल्याचं मत निलेश पाटील यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले “जवळपास 500 भूमिपुत्रांवर दाखल केलेले गुन्हे आमचा सन्मान आहे. अशा आंदोलकांचा ‘दि.बा. योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात येईल.”
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन होत असलेल्या या आंदोलनाकडे अनेकांचं लक्ष लागू आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय भाजपचे नेतेही आंदोलनात सहभागी होत असल्यानं चर्चा होत होती. मात्र, भाजपसह सहभागी होणारे इतर राजकीय नेते पहिल्यांदा भूमिपुत्र असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. पालघरपासून रायगडपर्यंत बहुजन समाजातील हजारो प्रकल्पग्रस्त दिबांचे चाहते या आंदोलनात सहभागी होण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे हे आंदोलन भाजप पक्षाचे नसल्याचं आंदोलकांनी नमूद केलंय.
नवी मुंबईत आंदोलनासाठी पोलिसांचा नकार असताना भूमिपुत्र मात्र आंदोलनावर ठाम आहेत. त्या पार्श्वभूमीवर 24 जून रोजी सिडको घेराव आंदोलनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवी मुंबई शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून पोलिसांनी गावोगावी मॉकड्रिल सुरु केली आहे. एकीकडे पोलिसांचे मॉकड्रिल तर दुसरीकडे भूमिपुत्रांच्या गावो गावी प्रचार फेऱ्या सुरु आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या 15 रेल्वे स्थानकांवर जवळपास 300 रेल्वे पोलीस दल आणि जीआरपी दाखल झाले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जून रोजी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला 1 लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. अशात कायदा व सु्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच हलक्या वाहनाच्या वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळचा वाद चिघळत चालल्याने उद्या होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्ववभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. संबंधित मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी याबाबत नोंद घेणे अपेक्षित आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाबाहेर पोलिसांच्या गाड्या मोठया प्रमाणात दाखल झाल्या आहेत. तर सीबीडी बेलापुरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आयुक्तालयात पोलिस अधिकाऱ्यांची उद्याच्या आंदोलनासंदर्भात बैठकी सुरु आहेत. बैठकीत उद्याच्या आंदोलनासंदर्भात नियोजनावर चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्याही नवी मुंबईत दाखल झाल्या असून सिडको कार्यालयाबाहेर पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला पोलिस छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे.
सिडकोवर काढण्यात येणार्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये मुंबई, ठाणे , पालघर, नाशिक, पुणे येथून एकूण5 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. शिवाय राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास 500 वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रीय झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्याचीही शक्यता आहे. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावरच गावकऱ्यांना रोखण्यात येणार आहे.