विरार-नालासोपारामध्ये आज पैसा वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपा आणि बहुजन विकास आघाडीत जबरदस्त द्वंद उभ्या महाराष्ट्रानेच नाही तर देशाने पाहिले. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी विवांत हॉटेलमध्ये आल्याचा दावा करण्यात आला आहे. विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटप करण्यासाठी आल्याची माहिती दस्तूरखुद्द भाजपमधूनच देण्यात आल्याचा गौप्यस्फोट ठाकुर यांनी केला आहे. तर दुसरीकडे विनोद तावडे हे बहुजन नेतृत्व आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांचा भाजपमधून गेम करण्यात आल्याचा, त्यांचे नेतृत्व संपविण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
विवांतमध्ये काय घडलं?
विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी त्यांना जवळपास चार तास घेराव घातला. अखेरीस विनोद तावडे, क्षितिज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हितेंद्र ठाकुर यांनी त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला. तर ठाकुर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आवाहन तावडे यांनी केली. तर राजन नाईक यांच्यासह दोघे हे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असल्याने त्यांना निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव केला.
भाजपामधूनच तावडेंविरोधात टीप
यावेळी हितेंद्र ठाकुर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी पाच कोटी रुपये घेऊन विवांतामध्ये आल्याची टीप भाजपामधूनच आल्याचा गौप्यस्फोट ठाकुर यांनी केला. भाजपामधील एका मित्राने ही माहिती दिल्याची माहिती ठाकुर यांनी दिली. यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती तावडेंनी केल्याची माहिती हितेंद्र ठाकुर यांनी दिली. त्यावर तावडे यांनी चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तावडेंचा गेम करण्याचा प्रयत्न?
तर दुसरीकडे विनोद तावडे हे बहुजन नेतृत्व आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांचा भाजपमधून गेम करण्यात आल्याचा, त्यांचे नेतृत्व संपविण्याचा डाव आखल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. आता या सर्व प्रकारावर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.