नवी मुंबई : मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. ठाण्यात हा वर्धापन दिन साजरा झाला. राज ठाकरे यांची पाठ फिरत नाही तोच ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या नवी मुंबईतील मनसेमधील गटबाजी उघड झाली आहे. नवी मुंबईत मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी राजीनामा दिला आहे. कालच घोरपडे यांनी राजीनामा पत्र दिलं आहे. राजीनामा देताना त्यांनी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गजानन काळे हे धमकी देत असल्याचा गंभीर आरोप घोरपडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रसाद घोरपडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आम्ही दिवस रात्र पक्ष वाढवण्यासाठी काम करतो. पण गजानन काळे कार्यकर्त्यांमध्येच भांडणे लावत आहेत. त्यांना पद देणे असे अनेक प्रकार घडत आहेत. माझ्या विरोधात मिटिंग लावून कोपरखैरणेत कार्यकर्त्यांना पद दिली. माझ्याविरोधात आणि पक्षा विरोधात त्यांच्या कारवाया सुरू आहेत. गजानन काळे यांनी कार्यालयात येऊन मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिली. त्याची तक्रार मी वरिष्ठ नेत्यांकडे केली. पण तरीही काळेंवर कारवाई करण्यात आली नाही, असं प्रसाद घोरपडे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
पदाला न्याय देता येत नाही तर पद घेऊन काय उपयोग? असा सवाल घोरपडे यांनी केला आहे. काळे यांच्या बायकोने देखील आरोप केले. मात्र त्यावर काही निर्णय घेण्यात आला नाही. राज ठाकरे न्याय देतील अशी आम्हाला अजूनही आशा आहे. पालिकेची कामे, लोकांशी निगडित कामे, पालिका कर्मचारी उत्तर देत नाही त्यावर वरिष्ठांना विचारले तर काही तोडगा निघाला नाही. अनेक लोकांची नावे देऊन पद द्या असे सांगितले. मात्र ते सुद्धा देण्यात आले नाही, असा आरोपही घोरपडे यांनी केला आहे.
गजानन काळे साथीदारांना घेऊन माझ्या कार्यालयात आले आणि मला धमकी दिली. त्यावेळी हात उचलला असता तर विचित्र प्रकार घडला असतात. हा प्रकार मी वरिष्ठांना कळवला आहे. राज ठाकरे यांना सांगण्यासही सांगितले आहे. त्यानंतर मी राजीनामा दिला आहे. मी पक्ष सोडत नसून पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धापन दिनाचा आम्हाला फक्त एसएमएस आला. बैठकीचा एसएमएस आला नाही. याची माहिती मी अमित ठाकरे यांना दिली होती, असंही त्यांनी म्हटलंय.
काळे मनसेत आल्यापासून अनेक लोक पक्ष सोडून गेले. अनेकांचे पक्ष सोडण्याचे कारण हे काळेच आहेत. काळे शहर अध्यक्ष आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत काम करणं शक्य नाही. पक्षाच्या अंतर्गतवादाला कंटाळलो आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांना काल राजीनामा कळवला आहे. काळे यांनी धमकी दिली होती, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. पण पक्षा मध्ये राहून काम करणार आहे, असंही ते म्हणाले.