नवी मुंबई : कोव्हिडची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असल्याचे आहे. महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हिड निर्बंधांमध्ये काहिशी शिथिलता देण्यात आली आहे. आजपासून लसीच्या दोन्ही डोझ घेणाऱ्या व्यक्तीला लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायला मिळणार आहे. तसेच शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापना आजपासून सुरू होणार आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. देशांतील जागतिक स्थितीचा आढावा घेता आरोग्य तज्ज्ञांमार्फत तिसऱ्या लाटेचा धोका संभवत आहे. त्यादृष्टीने काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने याविषयी सुरुवातीपासूनच खबरदारी घेत दुसऱ्या लाटेतील आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेतल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कोव्हिड विषयक आरोग्य सुविधांमध्ये पुरेशा प्रमाणात वाढ करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच नॉन कोव्हिड रुग्णांचीही गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. वाशी सार्वजनिक रूग्णालयाप्रमाणेच बेलापूर व तुर्भे रूग्णालयांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.
तिसऱ्या लाटेतील कोव्हिडग्रस्तांवरील उपचारांसाठी महानगरपालिकेच्या नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात येतेय. त्यामध्ये मुलांसाठी तसेच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात महिलांसाठी विशेष व्यवस्था असणाऱ्या आरोग्य सुविधा निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी या दोन्ही सुविधा कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत कामाला वेग देण्याचे निर्देशही दिले होते. याविषयी आयुक्त नियमित आढावा बैठक घेत आहेत. प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.
आरोग्य सुविधांमधील स्थापत्य आणि विद्युतविषयक तसेच ऑक्सिजन पाईपलाईन बाबतची कामे जलद करण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच एकूण 500 पर्यंत आय.सी.यू. बेड्स निर्माण करण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या उपलब्धतेकडेही काटेकोर लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत 100 व्हेंटिलेटर्स, 100 बायपॅप, 20 आयसीयू बेड्स, 500 मल्टिपॅरा मॉनिटर, 50 डिफायब्रिलेटर अशी उपकरणे उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. उर्वरित उपकरणेही जलद उपलब्ध करून घेऊन आरोग्य सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी विशेष आढावा बैठकीमध्ये दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.
दुसऱ्याया लाटेमध्ये जाणवलेला ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता ऑक्सिजनची क्षमता वाढविण्याकडेही विशेष लक्ष दिले आहे. नव्याने 80 टन क्षमतेचे टँक वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. त्यामध्ये 20 टनाचा टँक आलेला असून सिडको कोव्हीड सेंटरमध्ये तो बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे 20 टन क्षमतेचे आणखी 2 टँक एक महिन्याच्या कालावधीत लावण्यात येत आहेत. त्यास ड्युरा सिलेंडर भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यामधून इतर रुग्णालयांदेखील ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे एक 20 टन क्षमतेचा टँक ऐरोली रूग्णालयात बसविण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
यामध्ये ऑक्सिजन पीएसए प्लान्ट, ऑक्सिजन टॅंक, ड्युरा सिलेंडर उपलब्धतेबाबतचा आढावा घेताना या प्रक्रियेला अधिक गतिमानता देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर लॅबची क्षमता 5 हजारपर्यंत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचेही आदेशित करण्यात आले. याशिवाय सर्वसाधारण कोव्हिड बाधितांसाठी कोव्हिड केअर सेंटरमध्ये वाढ करण्याचेही नियोजन असून त्याविषयीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी आणि आरोग्य विभागाला देण्यात आले. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कोव्हीड बाधीतांची संख्या 50 पेक्षा कमी होताना दिसत असल्याने शासन आदेशानुसार दैनंदिन व्यवहाराला गती देण्यात आली आहे. तथापि कोव्हीडचा धोका टळलेला नसून ही संख्या मर्यादीत राखण्याकरिता नागरिकांनी कोव्हीड अनुरूप वर्तन ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
कोव्हिडच्या संक्रमणाला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने दैनंदिन टेस्ट्सची संख्या कमी न करता 7 हजारापर्यंत ठेवलेली आहे. कोव्हिड रूग्ण आढळलेल्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे टेस्टींग करीत टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. त्या सोबतच कोव्हीडची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी होण्यासाठी लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 7 लक्ष 9 हजार नागरिकांचा पहिला डोस झालेला आहे. 2 लक्ष 49 हजार नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत.
नागरिकांनी कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट जितकी दूर जाईल तितके अधिक नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित होतील हे लक्षात घेऊन कोव्हीड अनुरूप योग्य वर्तन ठेवत सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Navi Mumbai Commissioner Abhijit Bangar order to speed up covid work amid third wave