नवी मुंबई: आज येईल उद्या येईल म्हणून ज्याची चातक पक्षासारखी वाट पाहिली जात होती, त्या पावसाने (Rain)आज सकाळपासूनच संपूर्ण नवी मुंबईत (Navi Mumbai) जोरदार हजेरी लावली. सकाळी सकाळी आलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे जीवाची काहीली झालेल्या नवीमुंबईकरांना दिलासा मिळाला. पावसाने चांगलाच जोर धरल्याने काही भागात पाणी साचलं. मात्र, त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. आज सकाळीच पावसाने जोर धरल्याने चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी निघताना छत्र्या आणि रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावे लागले. मात्र, हवा आणि पाऊस याचा ताळमेळ न साधता आल्याने अनेक चाकरमानी पावसात भिजले. या भरपावसातच चाकरमान्यांनी रेल्वे स्थानक गाठले. मात्र, रेल्वेला प्रचंड गर्दी असल्याने चिंब भिजलेल्या परिस्थितीतही चाकरमान्यांना प्रवास करावा लागला. तर, शाळेत जावं लागत असल्याने बच्चे कंपनीला पावसाचा आनंद घेण्यापासून मुकावं लागलं.
बेलापूर – 29.00 मिमी
नेरुळ – 43.20 मिमी
वाशी – 16.40 मिमी
कोपरखैराने- 14.80 मिमी
ऐरोली – 22.60 मिमि
नवी मुंबईत सरासरी 24.30 इतका पाऊस झाला आहे. तर बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैराने आणि ऐरोली मिळून 92.48 मिमी पाऊस झाला आहे.
नवी मुंबईत पाच झाडे कोसळली आहेत. मात्र, त्यामुळे कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही. पण सोसाट्याच्या वाऱ्यांने झाडं मात्र कोसळली आहेत. पावसाने आता चांगलाच जोर दाखवायला सुरूवात केली आहे.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मोरबे धरणात 15.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत धरणात 78.60 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी 70.54 मीटरने वाढली आहे.