नवी मुंबई : महापालिका निवडणूक (NMMC ELECTION 2022) कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आतापासूनच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभागरचना (New Ward Structure) जाहीर झाली असली, तरी अजून आरक्षण जाहीर होण्याचा एक टप्पा बाकी आहे. त्यामुळे अनेक दाम्पत्य एका वॉर्डमधून पती तर दुसऱ्या वॉर्डमधून पत्नी अशी आगामी महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. आरक्षणाबाबत (Reservation) स्पष्टता बाकी असल्याने आम्ही अजूनही संभ्रमातच आहे. हा प्रभाग तर आपला बालेकिल्लाच आहे. समाजात उतरून काम केले आहे. शिवाय सगळी फिल्डिंग लावून बसलोय. कौल आपल्या बाजूने लागला तर विजय हा निश्चितच असणार भाऊ आपला, पण तरी सुद्धा कौल फिरला तर दोन्ही बाजूने लढण्याची आपण तयारी करणार आहे. इकडे बायकोला आणि शेजारच्या वॉर्डात मी लढणार आहे, असे या दाम्पत्यांकडून सांगण्यात येतेय.
निवडणुकीची तयारी जोरात सुरू
यांनी निवडणुकांची तायारीही आतापासूच जोरात सुरू केली आहे. सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड, युनिव्हर्सल कार्ड, इ-श्रमिक कार्ड सगळ्यांना वाटप करतोय. अगदी शेजारच्या प्रभागातील नागरिकांनाही कार्ड दिली आहेत. तर त्यांची देखील अनेक कामे मार्गी लावली आहे. एवढा खर्च केलाय कशासाठी भाऊ. दररोज या कामासाठी मी एकेकाला नऊशे हजेरी देतोय. दररोजचा खर्च सात-आठ हजार खर्च होतोय. आपण कुणालाच नाही म्हणत नाही. लोकांची रिघ येतीये ना तोपर्यंत हा उपक्रम चालूच ठेवणार आहे. जेव्हा वाटेल ना आता लोक येत नाहीत, ही कामाला ठेवलेली पोरं मोकाट बसलीत तेव्हा लगेच बंद करून टाकणार. लोक आपल्यावर खूश आहेत. अगदी येऊन भेटून सांगतात, झाल बर का माझं काम. तेव्हा आम्ही लगेच म्हणतो बस आमच्यावर लक्ष ठेवा काका, मावशी, दादा, भाऊ. असेही सांगण्यात येत आहे. तर काही महिलांना सुद्धा ताई, माई, अक्का विचार करा पक्का आणि माझ्या नावापुढेच मारा शिक्का. इच्छुकांकडून कामाची व लढण्याची सुरू असलेली ही पद्धत आता बहुतेक वॉर्डात दिसून येत आहे.
तयारीत असलेल्या दाम्पत्यांची नावं
प्रभाग क्रमांक 1 ते 41 पर्यंत निवडणूक लढवण्यासाठी काही इच्छुक दाम्पत्यांबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. दिघा विभागातून गवते व आंग्रे दाम्पत्य, ऐरोली विभागातून मढवी व सोनावणे, घणसोली विभागातून म्हात्रे, संकपाळ व दोन्ही पाटील, कोपरखैरणे विभागातून राऊत, पाटील, म्हात्रे, आचरे, भोईर, नाईक व कचरे, वाशी विभागातून, भोईर, मोरे, वाळुंज, शेवाळे, गायकवाड व भगत, तुर्भे विभागातून घरत, पाटील, कुलकर्णी, वास्के व मेढकर, सानपाडा विभागातून वास्कर, सूर्यराव, पावगे, बोऱ्हाडे, कुरकुटे व भगत, जुईनगर परिसरातून मढवी, औटी व ससाणे, नेरुळ विभागातून मांडवे, दोन्ही पाटील, मेहेर, ठाकूर, तिकोने, म्हात्रे, भोपी, इथापे, शेट्टी व भगत, बेलापूर विभागातून म्हात्रे, घंगाळे, पाटील, सुतार, नाथ व नरबागे दाम्पत्य निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.