नवी मुंबई : दैनंदिन व्यवहारात नागरिकांच्या जास्तीत जास्त संपर्कात येणाऱ्या घटकांच्या लसीकरणावर पनवेल महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. निराधार, बेघरांचे, शिक्षकांचे लसीकरण केल्यानंतर गृहसंकुलांतील सुरक्षा रक्षकांना, घरकाम करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिमा राबवल्या जाणार असल्याची माहिती पनवेल मनपाचे आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
मनपा क्षेत्रातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गृहसंकुलांतील सुरक्षा रक्षक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच वंचित घटक ज्यांना कोरोना लस दिली गेली पाहिजे याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन आनंद गोसावी यांनी केले आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनवेल मनपा क्षेत्रात दुसरी लाट ओसरल्यानंतर परत करोना रुग्णवाढ होऊ नये यासाठी पनवेल मनपाने पुढाकार घेतला आहे. शहरात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आहे. रुग्ण संख्या कमी असली तरी संपर्क साखळी तोडण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यासाठी दैनंदिन कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.
लवकरच शाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती (17 ऑगस्ट रोजी) पनवेल महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात आले होते. याला पनवेल कार्यक्षेत्रातून चांगला प्रतिसाद लाभला. दिवसभरात एकूण 475 शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले.
पनवेल कार्यक्षेत्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षकांचे लसीकरण होणे महत्वाचे असल्याने वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गशर्नखाली लसीकरण टीम यासाठी प्रयत्न करत आहे.
तसेच पालिका हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागातही सहा लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून लसींच्या उपलब्धीनुसार दैनंदिन होणारे लसीकरण देखील वाढविले आहे. याबाबतीत रोज विक्रमी लसीकरण करण्यांवर पालिका भर देत आहे. 16 ऑगस्टला आजवरचे सर्वात जास्त 5 हजार 202 लसीकरण झाले.
कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारीला गती द्या, नवी मुंबई आयुक्तांचे निर्देशhttps://t.co/WbrlEfrixM#NaviMumbai #CoronaUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2021
संबंधित बातम्या :
ईडीची कारवाई, सीआयडीची हाताची घडी, कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना पैशांची प्रतीक्षा