नवी मुंबई : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, यासाठी आता 24 जूनला सिडकोवर 1 लाख लोकांचं आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने विभागनिहाय बैठका आणि त्यामध्ये नियोजन करत जोरदार तयारी सुरु आहे. मात्र आंदोलकांकडून जय्यत तयारी सुरू असली तरी पोलिसांनी या आंदोलनाला अद्याप परवानगी दिलेली नाही, अशी माहिती पनवेलचे डीसीपी शिवराज पाटील आणि डीसीपी सुरेश मेंगडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. अशा प्रकारचे कुठलेही आंदोलन करण्यात आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला. तसेच या आधी झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या साखळी आंदोलनात सहभागी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याची कायदेशीर चाचपणी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने भूमिपुत्रांनी आपला जीव धोक्यात घालून जास्त माणसं एकत्र येऊ नये, असंही आवाहन पोलिसांनी केलं (Protest preparation for D B Patil name for Navi Mumbai airport).
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका होत आहे. त्या अनुषंगाने गव्हाण, पालीदेवद जिल्हा परिषद आणि पळस्पे, कोन पंचायत समिती विभाग निहाय बैठका संपन्न झाल्या. या बैठकीला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेठु पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विविध ग्रामपंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे म्हणाले, “आंदोलनासंदर्भात अशी कुठलीही परवानगी पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन न करता विनाकारण गर्दी जमा करु नये अशी आम्ही विनंती करतो.”
“याआधी झालेल्या साखळी आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती आणि 24 जूनला होणाऱ्या सिडको घेराव आंदोलनाला सुद्धा पोलिसांची परवानगी नाही. प्रयत्न झाल्यास आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे कुणीही आदेशाचे उल्लंघन करू नये,” असं मत पनवेल आणि नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी व्यक्त केलं.
आंदोलकांनी सांगितलं, “10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. ‘निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का’ ही प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून उजाडण्याची वाट पहात आहोत.”
“दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणांची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. दुसरीकडे महिलाही मागे राहिल्या नाहीत. 24 जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करु, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे. तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे,” अशीही माहिती देण्यात आली.
Protest preparation for D B Patil name for Navi Mumbai airport