सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घ्या, असं केलेलं आवाहन यामुळे शिवसेना नेते बॅकफूटवर आलेले दिसत आहेत. 2024 मध्ये शिवसेना-भाजपची युती होणार का?, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केला असता त्यांनी सोयीस्कर मौन पाळलं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (vinayak raut’s no comment on shiv sena-bjp alliance)
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांवरही टीका केली. तसेच प्रताप सरनाईक यांची बाजूही घेतली. पण 2024मध्ये शिवसेना-भाजपची युती होणार का? असा सवाल करताच त्यांनी मौन पाळलं. त्यांनी या प्रश्नाला हो ही म्हटलं नाही आणि ना ही म्हटलं नाही. फक्त महाविकास आघाडी पाच वर्षे चालणार, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं राऊत म्हणाले. मात्र, युती होणार का या प्रश्नाचं उत्तर देणं सोयीस्कर टाळलं. त्यामुळे राऊत यांच्या या मौनाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. एकीकडे शिवसेनेकडून राष्ट्रवादीशी युती करण्याचे जाहीरपणे सांगितलं जात होतं. मात्र, सरनाईक यांच्या पत्रानंतर शिवसेनेचे सर्वच नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे सरनाईक यांचं लेटरबॉम्ब हा सेनेच्या रणनीतीचा भाग होता?, या लेटरबॉम्बमधून काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा आणि भाजपला हातमिळवणीचा संदेश होता का? असे सवालही या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. तसेच शिवसेना-भाजपच्या युतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, असा आदेशच शिवसेना नेत्यांना ‘मातोश्री’तून मिळालाय का?, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
राऊत यांनी यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेतला. बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही. प्रताप सरनाईकांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावायचा, सीबीआयचं प्रेशर आणायचं आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने लिहून घ्यायचं. मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचं हा कुटील डाव ईडीचा आहे. अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत. सरनाईक यांना जो काही त्रास होतोय त्याच्या मुळाशी जाणं गरजेच आहे. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने ईडी त्रास देत आहे, तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. भाजप-शिवसेनेची युती नैसर्गिक होती. पण त्यावेळेला बेईमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला भाजपकडून दूर व्हावं लागलं. चंद्रकांत पाटीलांनी संजय राऊतांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही. स्वतःच्या बुडाखाली जे काही जळतंय ते आधी सांभाळा. संपूर्ण देशात केंद्राच्या माध्यमातून ईडी आणि सीबीआय, एनआयएचा ससेमिरा लावायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा हा एकमेव धंदा केंद्र सरकारने चालू केलेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे मोदींचं मनापासून आभार. यात पंतप्रधानांचा मोठेपणा आहे, असं ते म्हणाले. (vinayak raut’s no comment on shiv sena-bjp alliance)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 June 2021 https://t.co/DXYoMfiRxf #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या:
पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!
अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात ठाकरे सरकार सहकार्य करेना, CBI चा हायकोर्टात दावा
(vinayak raut’s no comment on shiv sena-bjp alliance)