अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी हनुमान चालिसावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज अमरावतीच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही पारंपारिक वेशात मंदिरात आले होते. दोघांनीही मंदिरात जमिनीवर बसून हनुमान चालिसाचे पठण केले. हनुमान जयंतीच्या (hanuman jayanti) पार्श्वभूमीवर त्यांनी हे पठण केलं. त्यापूर्वी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं अन्यथा आम्ही मातोश्रीवर येऊन आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून सर्व शिवसैनिक मातोश्रीवर आले आहेत. मात्र, राणा दाम्पत्य अजूनही अमरावतीत असल्याने ते मातोश्रीबाहेर आंदोलन करणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती शहरातील अकोली परिसरातील वीर हनुमानजी पगडीवाले बाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रवी राणा यांनी पूजा अर्चा केली. नंतर राणा दाम्पत्य आणि त्यांच्या समर्थकांनी मंदिरात बसून हनुमान चालिसा पठणास सुरुवात केली. तब्बल अर्धा पाऊण तास त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केलं. दोघांनीही एकूण 40 वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं.
यावेळी रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं. अन्यथा आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसाचं पठण करणार आहोत. महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण करणार आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी रामराज्यासारखं वागावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, राणा दाम्पत्य मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं वृत्त कळताच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर एकच गर्दी केली. शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर येत जोरदार आंदोलन करत राणा दाम्पत्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन दाखवावच शिवसेना काय आहे हे दिसून येईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. यावेळी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर नव्हते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मातोश्रीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या: