मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत मी येथील खासदाराला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव काही चांगला नव्हता, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. पवार यांची ही टीका राणा कुटुंबीयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्याचा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मागच्या निवडणुकीत पवार साहेबांनी नवनीत राणांना पाठिंबा दिला. प्रचार करायला आले. शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच नवनीत राणा खासदार झाल्या. शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या. ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या, त्या भाजपसोबत जाण्याची शरद पवारांची इच्छा होती, म्हणूनच त्यांनी अजित पवारांना त्यांनी पाठवलं, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे.
सुप्रिया सुळेंच्या हट्टापायी त्यांना थांबावं लागलं. शरद पवारांच्या मनामध्ये भाजप आहे. फक्त ओठावर विरोध आहे. शरद पवार साहेबांच्या मनामधील भाजपमध्येच नवनीत राणा आहेत. काँग्रेसच्या दबावामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे आज ते बोलले असतील, असा टोलाही राणा यांनी लगावला.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. संजय राऊत हे नाचोळे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजप सोबत बेईमानी केली. अमरावतीमध्ये हिंदुत्वाला डिवचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरेंचं खोटं हिंदुत्व उघड पडलेलं आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्यावरही टीका केली. बच्चू कडू हे मीडियाप्रेमी आहेत. मीडियामध्ये राहण्याची त्यांना सवय आहे. मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टीआरपी मिळवणे त्यांना आवडते. मैदानासाठी आम्ही परवानगी मागितली. सर्व परवानगी आमच्याजवळ आहे. बच्चू कडू हे हिंदुत्वाच्या विचाराचा विरोध करतात, असा आरोप त्यांनी केला.