अमरावती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा (navneet rana) या आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत मी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (hanuman chalisa) म्हणणारच. मला तुम्ही रोखू शकत नाही, असं सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडलाय का? असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे. 23 तारखेला आम्ही मुंबईला जाऊ आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा शांततेत वाचू. लिमिटच्या बाहेर कोणी जात असेल तर त्यांना उत्तर देण्याची आमची तयारी आहे. शिवसेनेने आम्हाला धमकी दिली होती पण आम्ही एक पाऊल मागे हटत नाही. त्यांच्या वेळेची आणि तारखेची आम्ही वाट पाहली पण ती त्यांनी दिली नाही. ज्यांच्यात जेवढी ताकद आहे त्यांनी आम्हाला थांबवून दाखवावं, असं आव्हानच नवनीत राणा यांनी दिलं आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होते.
यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विदर्भ दौऱ्यावरही टीका केली. संजय राऊत यांना आतापर्यंत विदर्भाची आठवण आली नाही. त्यांच्या पाठीशी मोदीजी होते, त्यांची विचारधारा होती म्हणून ते निवडून आले. आताच का शिवसेनेच्या खासदारांना विदर्भाची आठवण येत आहे? त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ज्यांच्यावर ते उभे होते ती जमीन सरकली आहे. विधानसभेत शिवसेनेचे जेवढे आमदार आहे ते मोदींजींच्या कृपेमुळे. विदर्भातील शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनाही काहीही पडले नाही म्हणून त्यांचा एकही दौरा विदर्भात झाला नाही, असा दावाही नवनीत राणा यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार रवी राणा यांनी मुंबईला जाणार असल्याची घोषणा केली आहे. शनिवार 22 तारखेला आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईला जाणार आहेत. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा आमदार रवी राणांनी निर्धार केला आहे. विदर्भ एक्सप्रेसने आमदार रवी राणा मुंबईला जाणार आहे. खुद्द रवी राणा यांनीच तशी माहिती दिली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने राणा दाम्पत्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या:
Devendra Fadnavis: राऊतांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, देवेंद्र फडणवीसांचा चिमटा