अमरावती लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अमरावतीतमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीत असूनही नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्याने नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. आता बच्चू कडू यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यानुसार रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव होणार आहे.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. दिनेश बूब हा माणूस रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. चित्रपटाचे जर दृश्य काढले तर त्यात तुम्ही दारू पिताना दिसतात. रवी राणांनी इतक्या व्यक्तिगत पातळीवर खाली जाऊन आमच्या उमेदवारावर आरोप करू नये. ज्याचं घर मातीचं आहे, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणाच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेयही रवी राणांना जाईल. रवी राणा व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती, असं बच्चू कडू म्हणाले.
मोदींनी स्पष्ट सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे प्रचाराला यावं लागतं. तुम्ही उमेदवाराकडे पाहू नका. मला पाहून मतदान करा, असं आवाहन मोदींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितले की, आमचा उमेदवार कार्यक्षम नसेल तर मला पाहून मतदान करा, याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांचे उमेदवार कार्यक्षम नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
याचा अर्थ फडणवीस आमच्यासोबत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या रॅलीत सर्वच मित्र पक्षांची नावे घेतली. तुमचं नाव नाही घेतलं. तुम्ही महायुतीत आहात की नाही? असा सवाल बच्चू कडू यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिंल. बरं झालं देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षाच्या यादीत आमचं नाव घेतलं नाही. त्यांनी नाव घेतलं असतं तर संभ्रम निर्माण झाला असता. त्यांनी आमचं नाव नाही घेतलं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आमच्या बाजूने आहेत, असा दावाही त्यांनी केला.
नंतर ग्लासवर ग्लास…
दरम्यान, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या उमेदवार दिनेश बुब आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्यांनी बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बळवंत वानखेडे यांच्या मतदारसंघात अंधार आहे. तिथे त्यांनी दिवे लावले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जनता आहे. तर दिनेश बुब हे दुपारी 12 वाजता झोपेतून उठतात. नंतर ग्लासवर ग्लास सुरू होतात. रात्री जुगार खेळतात अशा उमेदवाराला मतदान करू नका. हे लोक निवडून आले तर अमरावतीकडे लक्ष देणार नाही, अशी टीका रवी राणा यांनी केली होती.