महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यांसह इतर अनेक योजना यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरल्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले तर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, अशी जाहीर घोषणा केली. पण आता सरकार आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना कर्जमाफीचा विसर पडल्याचे दिसत आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक मोठे विधान केले आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यातील दौंडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी भाषणात आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही, असे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवारांनी केले. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी मिळणार की नाही, या संभ्रमात अडकले आहेत.
दौंडमध्ये केलेल्या भाषणात अजित पवारांनी एका कार्यकर्त्याला उद्देशून संवाद साधला. “माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफी ऐकलं का?.. मी एवढी भाषणं केली…तुला एक माहिती आहे का? अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, राज्याचा गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू… तुला मी माझी परिस्थिती सांगतो…मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही” असे अजित पवार म्हणाले.
यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी लाडक्या बहिणींनी जसा महायुती सरकारला पाठिंबा दिला, तसाच शेतकऱ्यांनीही दिला, असे विधान करण्यात आले. त्यावर अजित पवारांनी तातडीने खुलासा केला. त्यामुळेच आम्ही पाच आणि साडेसात एचपी मोटारीचे वीजबिल माफ केले आहे. काही लोकांची तीन, साडेतीन, चार लाखांपर्यंत वीजबिलं होती. ती झिरो करून दिली आहेत, असा दावा अजित पवारांनी केला.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. “विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरू आहेत. आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच यामुळे शेतकरी कर्जमाफी ही फक्त निवडणुकांच्या घोषणांसाठी मर्यादित होती का, असा प्रश्नही उपस्थितीत होत आहे. तसेच आता निवडून आल्यानंतर महायुती तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना कर्जमाफीचा विसर पडला आहे का, असा प्रश्न होत आहे.