Ajit Pawar Elected as NCP Group Leader : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवारांनी एका मोठ्या पदावर वर्णी लागली आहे.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात हालचालींना वेग आला आहे. सध्या अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे.
देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थितीत होते. यावेळी सर्व आमदारांनी एकमताने अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड केली. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांंनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनरही लागले आहेत. मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगितले आहे.
दरम्यान महायुतीमध्ये भाजपचे 132 तर शिवसेनेचे 57 आमदार विजयी झाले आहेत. तर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले आहेत. यानंतर आज अजित पवार यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.
तर दुसरीकडे शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवले आहे. सध्या या हॉटेलमध्ये साधारण ३० ते ३५ आमदार उपस्थितीत आहे. अनेक आमदार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. ग्रामीण भागातील आमदारांना पोहोचायला वेळ लागत आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत सर्व आमदार आल्यानंतर शिंदे गटाची बैठक होईल. या बैठकीत गटनेता निवडण्यात येईल.