सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्घाटनानंतर आठच महिन्यात कोसळला. त्यानंतर आता शिवप्रेमी आणि विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठिकठिकाणी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. अशातच आता राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त तांत्रिक समिती नेमणार आहेत. नवीन पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत. लवकरच त्या ठिकाणी दुसरा पुतळा बसवण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षाकडूनच आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट राजकोट किल्ल्यावर जात मूक आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत पत्र काढलं आहे. त्यामुळे काल महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर आता आज सरकारमध्ये सहभागी असणारा सत्ताधारी पक्षच आंदोलन करणार आहे. या आंदोलनावेळी काय घडतं? हे पाहावं लागेल.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गट यांच्यात राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही काय पहायला येण्याची गोष्ट आहे का? असं म्हणत नारायण राणे आक्रमक झाले. पण त्याच राजकोट किल्ल्यावर जात आम्हाला पाहणी करायचीय असंही राणे म्हणत होते. यावेळी राजकोट किल्ला परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर काल ठाकरे गटाचे कार्यकर्ते विरूद्ध राणे समर्थक यांच्यात राडा झाला. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयाचे 30 पोलीस कर्मचारी राजकोट किल्ल्यावर बंदोबस्तसाठी आहेत. काल रात्रीपासून राजकोट किल्ल्यावरील सुरक्षा वाढवली आहे. आता 24 तास राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.