जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एकेकाळचा सहकारी, कट्टर समर्थक देणार लढत; अजितदादांची मोठी खेळी?

| Updated on: Oct 23, 2024 | 2:46 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वत: अजित पवार रिंगणात उतरणार आहेत. तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एकेकाळचा सहकारी, कट्टर समर्थक देणार लढत; अजितदादांची मोठी खेळी?
आमदार जितेंद्र आव्हाड
Follow us on

Kalwa Mumbra Constituency Jitendra Awhad vs Najeeb Mulla : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी आता विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, मनसे, शिंदे गटापाठोपाठ आता अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वत: अजित पवार रिंगणात उतरणार आहेत. तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे.

नजीब मुल्ला यांना कळवा मुंब्रा विधानसभेचे तिकीट जाहीर 

राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. अजित पवार गटाकडून कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांबरोबर राहणे पसंत केले. तर आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाडांचे एकेकाळचे सहकारी असून त्यांनाच अजित पवारांनी कळवा मुंब्रा विधानसभेचे तिकीट जाहीर केले आहे.

जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी ते आव्हाडांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांच्यातही फूट पडली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंब्रा-कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी लढत होणार आहे.

28 ऑक्टोबरला दाखल करणार अर्ज

अजित पवारांनी सोमवारी एबी फॉर्मचे वाटप केले होते. यात नजीब मुल्ला यांचा समावेश होता. तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवाराबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. येत्या 28 ऑक्टोबरला नजीब मुल्ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाड देखील याच दिवशी आपला अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्या थेट सामना होणार आहे.