ठाणे : 8 ऑक्टोबर 2023 | लोकसभेत महायुतीचा जो ही उमेदवार असेल त्यांच्यामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही आमची भूमिका आहे. भविष्यात पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईन. निवडणुकीत पडणारी मतं ही पक्षाची ताकद असते. त्यामुळे कुणी काय भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता निवडणूक आयोगात लढाई सुरु झाली आहे. चिन्ह आणि पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईलच. पण, त्यावेळी अजित पवार यांना संघटनेच पद द्या, अशी मागणी मी केली होती असे अजितदादा गटाचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात अविनाश जाधव यांचे उपोषण सोडण्यास आले होते. राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अविनाश जाधव यांनी साखळी उपोषणाचं आंदोलन करून कार्यकर्त्यांना वेठीस धरलं. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले तर टोल प्रश्नावर तोडगा निघू शकतो हे मी आधीच सांगितलं होतं, असा टोला त्यांनी अविनाश जाधव यांना लगावला.
ठाणे टोलचे दर तीन वर्षांनी ५ रुपये वाढत असतात. २०१० पासून ते २०२६ पर्यंत हा करार आहे. परंतु, अविनाश जाधव यांना नाटकी आंदोलनं करायची सवय आहे. कार्यकर्त्यांना वेठीस धरायचं हा त्यांचा स्थायी भाव आहे. अखेर याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनातून काही साध्य झालं नाही, अशी टीकाही परांजपे यांनी केली.
टोलचा हा प्रश्न ठाण्यापुरता नाही तर मुंबईच्या एन्ट्री पॉंईंटसंदर्भातील आहे. एम एच ०४ संदर्भात दिलासा दिला पाहिजे. २०१० साली झालेला करार आहे. तो निर्णय राज्य शासनाने घेतलाय. त्यामुळे कंत्राटदार यातून लहान गाड्यांना मुंबई एन्ट्रीवर टोलमुक्ती देणार नाही. टोलचा प्रश्न हा आमच्याही जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती मिळावी. मात्र, ते नेहमीच वादग्रस्त विधानं करतात. खळखट्ट्याक करत हे आंदोलन सुटणार नाही, असेही ते म्हणाले.
वायबी सेंटर येथे पवार साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा आम्हाला देखील अश्रू अनावर झाले. परंतु, सारखं सारखं अश्रू आणून आमदार जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असं वाटत नाही. पवार साहेबांबरोबर आमच्या पण भावना आहेत. मात्र, आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाहीत, असा टोला त्यांनी आमदार आव्हाड यांना लगावला.