Chhagan Bhujbal CM Devendra Fadnavis Meet : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ वेगळी वाट धरणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता नाराज झालेले छगन भुजबळ भाजपच्या बड्या नेत्याच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. छगन भुजबळ हे राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थित राहिले नाहीत. यानंतर छगन भुजबळ हे बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात होतं. त्यातच आता छगन भुजबळ हे भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेताना पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ सकाळी १० च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काल छगन भुजबळांनी ओबीसी संघटनांसोबत एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ओबीसी संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यानंतर आज ते सकाळी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या अर्धा तासांपासून छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होत आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे, याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र अचानक होणारी ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. “मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.
“प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे. मला त्यांनीच लोकसभेत उभे राहा असे सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात असावे, यासाठी आग्रह धरला होता. हे मी स्वत: कन्फर्म करुन घेतले आहे.”, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले होते.