“छगन भुजबळांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा, आम्ही युती करु”, महादेव जानकरांचा सल्ला, भुजबळ म्हणाले…

| Updated on: Jan 03, 2025 | 2:20 PM

"आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी त्यांनी ते करावं. त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल. आताच नाही पुढच्या पिढीचंही भलं होईल", असे महादेव जानकर म्हणाले.

छगन भुजबळांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा, आम्ही युती करु, महादेव जानकरांचा सल्ला, भुजबळ म्हणाले...
Chhagan Bhujbal mahadev jankar
Follow us on

Chhagan Bhujbal On Mahadev Jankar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छगन भुजबळांना एक सल्ला दिला आहे. “छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा”, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. त्यावर आता छगन भुजबळांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

महादेव जानकरांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’सोबत संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळांवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळांना एक मोलाचा सल्लाही दिला.

“आम्ही तुमच्याबरोबर युती करु”

“ओबीसींची अशीच अवस्था होणार आहे. ज्या समाजाचे दल आहे, त्या समाजाचे बळ आहे. अन्याय झाला म्हणून मी आता बोलू शकणार नाही. कारण आपला पक्ष नाही. आपण याचिकाकर्ते आहोत. देणारे बनणारे असाल, तर आम्ही आमचं दल केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा, आम्ही तुमच्याबरोबर युती करु. त्यांनी जर हा निर्णय घेतला तर चांगलं होईल. आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी त्यांनी ते करावं. त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल. आताच नाही पुढच्या पिढीचंही भलं होईल”, असे महादेव जानकर म्हणाले.

“मागितल्याने भीक मिळते, हक्क मिळत नाही त्यामुळे मागण्यापेक्षा देणार झालं पाहिजे ओबीसीबाबत भाजप आणि काँग्रेसची पण नियत चांगली नाही. राज्यात एव्हीएम सेट करण्यात आला म्हणून यांची थंपिंग मेजोरिटी आली. आमची मतही भाजपला वळवण्यात आली आहेत. बलेट पेपरवर निवडणूक घ्या, आमच जे होईल ते होईल. ईव्हीएम लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. आम्ही आता एनडीएतून बाहेर आहोत”, असेही महादेव जानकरांनी म्हटले.

छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान महादेव जानकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर छगन भुजबळांनीही भाष्य केले आहे. “महादेव जानकर यांच्या समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा या वक्तव्यावर छगन भुजबळांनी ठीक आहे”, असे म्हटले आहे.