संपूर्ण राज्याचे नव्हे तर अख्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांची आता कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. 10 तारखेच्या आसपास निवडणुकांची तारीख घोषित होऊ शकते. अवघ्या महीना दीड महिन्यावर आलेल्या निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते झटून कामाला लागले आहेत. याचदरम्यान राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निवडणुकीसंदर्भात महत्वाचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका न लढण्याचे अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर केले. मात्र आता त्यांच्या याच विधानावरून त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के असतील तर ते विधासभा लढणार नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र काही वेळा खुद्द अजित पवार हेच पुन्हा बारामतीतून उभे राहणार असल्याचेही बोलले जात आहे. पण बारामतीमधील एका कार्यकर्मात अजित पवार यांनीच हा संभ्रम दूर करत अप्रत्यक्षरित्या निवडणूक न लढण्याचे संकेत दिले. मी जो उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
काय म्हणाले अजित पवार ?
“गेल्यावेळी जेवढे आमच्या परिवारातील लोक तुम्हाला भेटायला येत होते, तेवढं यावेळी जास्त कोणी येणार नाही. उलट, यावेळेस मी जो उमेदवार देणार आहे, त्या उमेदवाराच्याच कामाकरिता… त्याच पद्धतीने त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण करणार आहेत, ते त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल.उमेदवार अर्ज भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगेन” असे अजित पवार म्हणाले.
श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया काय ?
खरं म्हणजे दादा (अजित पवार) नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो. मी जे बोलतो तसंच करतो,असं ते नेहमी म्हणतात. ते जर खरंच शब्द पाळणारे असतील तर ते निवडणुकीला उभं राहणारही नाही, सांगता येत नाही,असं श्रीनिवास पवार म्हणाले.
मी चूक केली
दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत बारामतीत कुटुंबातील उमेदवार देऊन मी चूक केली. राजकारण घरात आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सुनेत्रा पवार यांना बहिणीच्या विरोधात उभं करून मी चूक केली. हे व्हायला नको होतं, असे अजित पवारांनी म्हटले होते.
बारामतीत पराभव होताच श्रीनिवास पवारांच्या अजितदादांना कानपिचक्या
लोकसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष बारामतीकडे लागलं होतं, तेथे पवार वि. पवार असा सामना रंगला. या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना दारूण पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण निवडणुकीत पवार कुटुंबाच्या बाजूने बोलणारे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी या निकालानंतर अजित पवारांवर हल्ला चढवला होता. बारामती ही शरद पवार यांचीच हे सिद्ध झालंय, असंही श्रीनिवास पवार म्हणाले होते. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतं, त्यामुळे कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत आणि आमचे कुटुंब प्रमुख शरद पवारचं आहेत, अशी भूमिका श्रीनिवास पवार यांनी मांडत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.