दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीला केलेल्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निषेध केला. केजरीवालांच्या अटकेची कारवाई चुकीची आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच राज्यातील राजकारणाबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं. पुणे, सातारा किंवा माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह शरद पवारांना केला जात होता. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार हे पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता, मात्र आता शरद पवार यांनीच यावर उत्तर देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी सांगितलं.
यापूर्वीही शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं होतं. आज पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आता आपण कोणतीच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. राजकीय जीवनात 14 निवडणुका लढलो आहे. या सर्व निवडणुका मी जिंकलो आहे. आता आणखी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, असं ते म्हणाले.
माढ्याच्या जागेसाठी पवारांच्या मनात कोणता उमेदवार ?
माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील. महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल असं शरद पवार म्हणाले. तसेच, आपण माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई चुकीची
या पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही भाष्य केलं. निवडणुकीच्या काळात भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.