Sharad Pawar : साहेब, तुम्हाला एवढी एनर्जी कुठून येते?; शरद पवार यांनी सांगितलं रहस्य

| Updated on: Oct 04, 2024 | 1:07 PM

राज्यात निवडणूक आल्या आहेत. येत्या 10 तारखेच्या आसपास निवडणूक जाहीर होतील. 10 ऑक्टोबर रोजी निवडणुका जाहीर झाला तर आश्चर्य वाटणार नाही. आणि उद्याचा महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचं हे ठरणार आहे. राज्य हातात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करायची आहे. महाराष्ट्र शिवरायांचं राज्य आहे. त्यामुळे महाराजांचा विचार अबाधित कसा राहील हे या निवडणुकीतून पाहायचं आहे, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : साहेब, तुम्हाला एवढी एनर्जी कुठून येते?; शरद पवार यांनी सांगितलं रहस्य
शरद पवार
Follow us on

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी 83 व्या वर्षीही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायला अजून वेळ आहे. पण शरद पवार यांनी आधीपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, मेळावे, शिबीर, सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय शरद पवार हे शेतकऱ्यांशी संवाद ठेवून आहेत. तसेच प्रत्येक बातमीवर, घडामोडींवर त्यांची अचूक नजर असते. या वयातही सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत ते काम करत असतात. याबाबत त्यांना विचारण्यात आलं. साहेब, एवढी एनर्जी तुमच्याकडे कुठून येते? तुमच्या या सक्रियेतेचं रहस्य काय? असं पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं. त्यावर शरद पवार यांनीही मिश्किल उत्तर दिलं. वय वाढतं तशी एनर्जी वाढते, असं शरद पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

शरद पवार सांगलीत आले आणि त्यांनी पत्रकारांशी दिलखुलासपणे चर्चा केली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदावर दावा करणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्या पक्षात आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा केली. एक म्हण आहे. मी काही जातीवाचक आहे असं म्हणू नका. बाजारात तुरी… माहीत आहे का? कशाचा काहीच पत्ता नाही अन् मुख्यमंत्रीपदाबाबत आजच चर्चा सुरू आहे. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. सरकार बनवण्यासाठी बहुमत पाहिजे. बहुमत असेल तर नेता निवडता येईल. नेता निवडल्यावर मुख्यमंत्री बनेल. कशाचं काही नाही. उगीच आपलं काही तरी करता? यावर जयंत पाटील कधी बोलतात का? त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे, असं शरद पवार म्हणाले.

एक तरी सीट निवडून आलीय का?

शरद पवार यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते फक्त मराठ्यांचे नेते राहिले आहेत. त्यांचा ओबीसी जनाधार निघून गेला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी आंबेडकरांवर खोचक टीका केली. कालच्या निवडणुकीत लोकांनी कुणाला पाठिंबा दिला हे जगजाहीर आहे. त्यांची संपूर्ण राज्यात एक तरी जागा निवडून आली आहे का? ज्यांना एकही जागा मिळत नाही. ते इतरांवर भाष्य करत आहेत. मीडियात नाव छापून येतं म्हणून टीका करणं ठिक आहे, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.

खासगी गोष्टी सांगायच्या नसतात

भाजपमधील अनेक लोक शरद पवार यांना भेटत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक जुने सहकारी तिकडे आहेत. भलतीकडे गेले होते. हा रस्ता काही खरा नाही हे त्यांच्या लक्षात आलं. योग्य रस्त्यावर येण्यासाठी भेटत आहेत. अनेक वर्ष काम केलं. ते येतील. आमचं म्हणणं आहे. एकत्र काम करू. महाराष्ट्रातील लोकांचं काम करू. अनेक लोक भेटतात. काही लोक खासगी गोष्टींसाठी भेटतात. त्या सांगायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

विषय लवकर संपवा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही त्यांनी भाष्य केलं. संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील हे जागा वाटपाचं पाहात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचश्या जागांवर हे नेते अनुकूल आहेत. त्यांची अंडरस्टंडिंग झाली आहे, असं ऐकून आहे. आता हे तिन्ही नेते 7,8 आणि 9 तारखेला एकत्र बसतील. लवकर बसून हा प्रश्न संपवा. म्हणजे लवकर लोकांमध्ये जाऊ. दिवस थोडे राहिले आहेत. लोक आपल्याला अनुकूल आहे. आपण लोकांचा आदर केला पाहिजे, असंही ते म्हणाले.