नाशिकः नाशिकमधून (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपाल हटाव मोहीम सुरू केलीय. त्यासाठी थेट राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पक्ष आक्रमक झालाय. राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने हटवावे, अशी मागणी करण्यात आलीय. राज्यपाल कोश्यारी सतत या-ना त्या कारणाने चर्चेत आणि विशेषतः वादात असतात. यापूर्वी राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रापत्री चांगलीच रंगली. त्यावरून भाजप-शिवसेनेमध्ये वाद पेटल्याचेही महाराष्ट्राने पाहिले. मात्र, आता कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून भाजपचीही कोंडी केलीय.
प्रकरण काय?
औरंगाबादमध्ये रविवारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.
राष्ट्रपतींना साकडे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केलीय. यासाटी 6000 पत्रं राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खैरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊनी संस्कार केले. त्या आधारावर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांचे गुरू राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, दादाजी कोंडदेव हे होते.
ते लायकीचे नाहीत
अंबादास खैरे म्हणाले की, प्रसिद्ध इतिहास लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात सुद्धा समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधीच झाली नसल्याचा उल्लेख आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राहायच्या लायकीचे नाहीत. राज्यपालांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सहा विभागातून प्रत्येकी हजार याप्रमाणे सहा हजार पत्र राष्ट्रपतींना पाठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग