गोंदिया | 25 ऑक्टोंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं. मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. मात्र, जे टिकेल आणि दीर्घकाळ चालेल असे आरक्षण मिळावं असे प्रयत्न सरकार करत आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे तांत्रिक आणि न्यायिक बाबींवर सुद्धा टिकेल यासाठी सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. सध्या निजाम काळातील कुणबी समाजाचे पुरावे असणाऱ्यांचा मराठा समाजात समावेश करण्यात आला. परंतु, हे आरक्षण दीर्घकाळ टिकणारे असावे, त्याचा फायदा मराठा समाजाला मिळावा असे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मराठा समाजाने थोडा धीर आणि संयम दाखवावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केले.
गोंदिया येथे प्रसारमाध्यमांसमोर ते बोलत होते. शिवसेनेचा (ठाकरे गट ) शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचार मुक्त भारत करू असे म्हणाले होते. पण, आज राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्टाचारी मंत्री सरकारमध्ये सामील आहेत अशी टीका केली होती. त्यावर बोलताना पटेल म्हणाले, संजय राऊत काय बोलतात याच्यावर आम्ही बोलणं हे काही महत्त्वाचं नाही. आम्ही आमच्या कामावर लक्ष ठेऊन आहोत असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. मात्र, त्यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, त्यांनी भविष्यात काय करायचे आहे याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट ) आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढत आहेत. पुणे ते नागपूर असा त्याची यात्रा आहे. या यात्रेचे विदर्भात स्वागत आहे. आतापर्यंत त्यांनी वेगळे राजकारण केले आहे. आता महाराष्ट्र फिरल्यावर त्यांना आणखी राजकारण कळेल. महाराष्ट्रात फिरल्यानंतर महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत. महाराष्ट्राच्या अडचणी काय आहेत याची जाणीव त्यांना होईल. ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत त्याचे स्वागत आहे असे पटेल म्हणाले.
संघर्ष यात्रेमुळे रोहित पवार महाराष्ट्रात फिरतील. त्यामुळे त्यांना समस्या कळतील. त्यावर काय उपाय करायचे हे कळेल. आतापर्यंत त्यांनी फक्त विरोधात बसून टोमणे मारले आहेत. टोमणे मारून काही होत नाही. तर, महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारमध्ये असणं किती महत्त्वाचे हे नक्कीच त्यांना कळेल. हे वेगळ राजकारण त्यांना समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.