रत्नागिरी : राज्यात सध्या ईडीच्या (ED) धाडी आणि किरीट सोमय्यांची आरोपांची (Kirit Somaiyya) सुसाट गाडी यावरून पेटलेला वाद रोज वाढतच चालला आहे. आजही किरीट सोमय्या पुन्हा शिवसेनेला माफियासेना म्हणून गेले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीही (Ncp) सोमय्यांविरोधात आक्रमक झाली आहे. कोकणातल्या एका राष्ट्रवादी नेत्यानं किरीट सोमय्यांनी कोकणात आगामी दौऱ्याला येऊनच दाखवालं असं थेट आव्हान दिलंय. किरीट सोमय्या हे कोकणात येऊन कोकणातल्या पर्यटन व्यवसायिकांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. ते व्यवसायिकांना घाबरवत आहेत, असा आरोप स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलाय. 26 मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. सोमय्या यांनी येऊन दाखवावे, आम्ही त्यांना रोखणार, त्यांना जशास तसे उत्तर देणार अशी भूमिका माजी आमदार संजय कदम यांनी घेतलीय.
हाही दौरा वादाचा ठरणार?
भाजप आमदार किरीट सोमय्या यांचा दापोली दौरा वादातील ठरण्याची शक्यता आहे. 26 मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तापलेय. राज्यात या अगोदर शिवसेना विरुद्ध सोमय्या असा संघर्ष पाहायला मिळत होता. आता यात राष्ट्रवादीने देखील उडी मारली आहे. किरीट सोमय्या 26 तारेखला शक्तीप्रदर्शन करत दापोलीत मार्च काढणार आहेत. 100 गाड्यांचा ताफा घेऊन दापोली तालुक्यातील मुरुड इथल्या साई रिसॉर्टवर हा मार्च काढण्यात येणार आहे. पालकमंत्री अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे सोमय्या यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. तरी या दौऱ्याला आता राष्ट्रवादीने आव्हान दिले आहे, राजकारण होत असल्याने पर्यटनावर परिणाम होत असल्याचा आरोप संजय कदम यांनी केलाय.
सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडी
गेल्या अनेक दिवसांपासून किरीट समय्या हे शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर तुटून पडत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील डझनभर मंत्री जेलमध्ये जाणार असल्याचा दावा सोमय्यांकडून करण्यात येत आहेत. तर शिवसेनेविरोधत तर सोमय्यांनी जोरदार रणशिंग फुंकलं आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्या हा सामना गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय. त्यात आता राष्ट्रवादीहीने उडी घेतल्याने हा वाद आणखी वाढला आहे. आता सोमय्यांच्या दौऱ्यावेळी नेमकं काय होणार? असा सवाल प्रत्येकाच्या मनात तयार झाला आहे.