जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या गाड्यांचा ताफा शुक्रवारी भुसावळमध्ये अडवण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे यांच्यासह इतर 10 संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध स्थानिक पातळीवर असलेल्या नाराजीतून हे आंदोलन करण्यात आल्याचे समजते. (NCP Jayant Patil parivar samvad yatra in Bhusawal)
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर आंदोलकांनी संतोष चौधरी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी गाडीतून खाली उतरत आंदोलकांशी संवादही साधला.
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गुरुवारी पहिल्यांदाच पक्षातील अंतर्गत गटबाजीचा अनुभव आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते.
मात्र, यापैकी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर सोपविली आहे. अशावेळी स्वागताच्या फलकावर त्यांचाच फोटो न लावण्यात आल्याने प्रचंड चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील गटबाजीतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसे यांचे छायाचित्र असलेली बॅनर्स लावण्यात आल्याने हा वाद निवळल्याचे समजते.
जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल 107 बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
संबंधित बातम्या:
..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे
शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे
(NCP Jayant Patil parivar samvad yatra in Bhusawal)