मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेली डॉक्टरेट यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर ही फ्रेम करून लटकवली पाहिजे असा टोला ट्विट करून लगावला आहे. मात्र, संजय राऊत यांच्या विधानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मोदी यांच्या पदवीपेक्षा आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत याची आठवण संजय राऊत यांना करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये 2014 ला स्वतःचा करिष्मा निर्माण केला. जो भारतीय जनता पक्ष काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत नव्हता तो पक्ष वाढला. त्याचे श्रेय सर्वस्वी हे नरेंद्र मोदी साहेबांना दिले पाहिजे असे पवार म्हणाले.
सुरुवातीपासून आतापर्यंत जे कोणी देशाचे पंतप्रधान झाले. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री झाले. त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून सत्तेत आणले. लोकसभेत ज्याच्याकडे 543 संख्या इथले बहुमत आहे तो तिथे प्रमुख होतो. आपल्या राज्यामध्ये 146 बहुमत असेल, ज्याला पाठिंबा असेल तर त्याचा मुख्यमंत्री होतो याची आठवणही त्यांनी करून दिली.
शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचे तर ज्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस किंवा तशा पदव्या आहेत ते झाल्याशिवाय तो तिथे काम करू शकत नाही. पण राजकारणामध्ये असे नाही. त्यामुळे डिग्रीवर बोलण्यापेक्षा देशात, राज्यात अनेक इतर विषय महत्वाचे आहेत. त्यावर कुणी चर्चा करायची नाही का ? बेरोजगारी वाढली आहे. सगळे मुले मुली आम्हाला कधी नोकऱ्या मिळणार ? असा प्रश्न करत आहेत.
वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये 75 हजारांची भरती होणार त्याचे काय झाले ? ते आपण सोडून देतो. शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्याला गोष्टीला महत्त्व द्यावे. त्यामुळे कुणाची डिग्री काय आहे त्याला महत्व देण्याची गरज आहे असे आम्हाला अजिबात वाटत नाही असे पवार म्हणाले.
पंतप्रधानांच्या डिग्रीचा विषय काढला जात आहे. तो महत्वाचा प्रश्न नाही. असे विषय काढून आपण देशाला मागे नेत आहोत. काही विषय काढला तरी इतिहासात ज्याची नोंद आहे तीच कायम राहणार. मात्र, आपण कोणत्या विचारसरणीत जाऊन काय करत आहोत हे मला तरी काही कळत नाही. यापेक्षा गॅस सिलेंडर, महागाई, बेरोजगारी याबद्दल बोलायला हवे अशी शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.