पुणे | 8 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांचा कायदेशीर वॉर आता खऱ्या अर्थाने सुरु झालाय. कारण दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने उत्तर दाखल केल्याची माहिती आधी समोर आली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडूनही उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही गटांमधील कायदेशीर लढाई आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून आता उत्तर दाखल करण्यात आल्याने लवकरच निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडूनही केंद्रीय निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार गटाने आपल्या उत्तरात शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा देखील उल्लेख केला आहे. शिवसेनेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा आणि कायद्याचा सारांशदेखील उत्तरात नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उत्तरात अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, असं म्हटलं आहे. तसेच पक्षाचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे पक्ष आमचा आहे, असं म्हणत उत्तरात शिवसेनेच्या निकालाचा दाखला देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील लढाई ही अगदी शिवसेनेसारखीच होताना दिसत आहे. कारण शिवसनेच्या सुनावणीवेळी देखील असेच दावे करण्यात आले होते. अजित पवार यांच्या गटाकडे 40 आमदारांचा पाठिंबा आहे. यातील प्रत्येक आमदार हा लाखो नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव आमच्याकडेच असायला हवं, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांची आहे. अशीच भूमिका शिवसेनेच्या सुनावणीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची होती. विशेष म्हणजे त्यांचाच गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं होतं.
दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडूनही निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. या उत्तरात शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळले आहेत. तसेच अजित पवार यांच्या गटाच्या 9 मंत्री 31 आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांच्या गटाने उत्तरात केली आहे. निवडणूक आयोगाने उत्तर दाखल करण्यासाठी दोन्ही गटांना 9 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आज दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे.