राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र नव्याने सरकार तयार करताना अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आलेले आहे. यात राष्ट्रवादीचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपाचे सुधीर मुनगुंटीवार यांची नाव टळकपणे समोर आले आहे. छगन भुजबळ यांना डावल्याने त्यांनी नाशिक येथे ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यभरात फिरुन यल्गार करण्याची घोषणा केली होती. आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींची मुंबईत भुजबळ यांच्या सिद्धगड बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुमचा वापर करुन घेतला का असा सवाल विचारला पत्रकारांनी विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार आहे !
हिवाळी अधिवेशनात रखडलेले खाते वाटप आता झाल्याने मंत्री आपआपल्या मतदार संघात जल्लोषात परतत आहेत. तर मंत्री म्हणून डावलेले नेते दुसरीकडे आपल्यावरील अन्यायाबाबत पुढील रणनीती ठरवित आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे नाराज नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज ओबीसींची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे म्हणणे आपण ऐकून घेतल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यानंतर पुढील भूमिका काय घेणार असे पत्रकारांनी विचारले असता भुजबळ यांनी चिडून माझ्या भूमिकेची तुम्हालाच जास्त घाई लागलेली दिसतेय असे उत्तर दिले, आपण आणखी काही दिवस कार्यकर्त्यांचे मन जाणून त्यानंतर योग्य निर्णय घेऊ असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
एका प्रश्नाचे उत्तर देताना भुजबळ म्हणाले आधी मला लोकसभेची तयारी करायला सांगितले. तेव्हा मी तयारी केली. मला थांबवले गेले, दोन राज्यसभेच्या निवडणूका आल्या, मला राजकारणात ४० वर्षे झाल्याने तेव्हा मी जायला तयार होतो. तेव्हा मला रोखण्यात आले. मला तेव्हा सांगण्यात आले की तुमची राज्यात अधिक गरज आहे.मग आता गरज संपली का ? तरुणांना संधी द्यायची होती तर मला निवडणूकीला उभेच कशाला केले? मी तर केंद्रात जायला तयार होतो. आता सांगतात तुम्ही राज्य सभेवर जा म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्यायचा, ते मग उभे का केले ? तरुणांना संधी द्यायची तर तरुण म्हणजे किती वयाचा ६७ – ६८ वर्षांचा तरुण की आणखी किती याची व्याख्या किंवा क्रायटेरिया काय ठरायला हवा ना असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुमचा वापर केला गेला असे तुम्हाला वाटते का असा सवाल केला असता वापर करुन घेतला जाताे हे मला माहीती नाही? परंतू ओबीसींसाठी वापर होण्यास मी सदैव तयार आहे असेही भुजबळ म्हणाले.