Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
छगन भुजबळ सकाळी १० च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आज सकाळीच ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ रवाना झाले. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र अचानक झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कौतुक केले होते. “प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे. मला त्यांनीच लोकसभेत उभे राहा असे सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात असावे, यासाठी आग्रह धरला होता. हे मी स्वत: कन्फर्म करुन घेतले आहे.”, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले होते.