Hasan Mushrif | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ यांना सर्वात मोठा झटका

| Updated on: Apr 11, 2023 | 5:47 PM

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज कोर्टाने अखेर निकाल दिला आहे. हा निकाल मुश्रीफ यांना धक्का देणारा आहे.

Hasan Mushrif | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ यांना सर्वात मोठा झटका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना कोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने (Mumbai Session Court) मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. सेशन्स कोर्टाच्या या निकालानंतर आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हसन मुश्रीफ हे सध्या ईडी (ED) कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरुवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं गेले. या सगळ्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई सेशन्स कोर्टाची पायरी चढली होती. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवादही करण्यात आला होता. त्यामुळे मुश्रीफांना जामीन मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. विशेष म्हणजे मुश्रीफांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांपूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता. कोर्टाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला होता. कोर्टाने ज्या तारखेला निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं त्यादिवशीही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज अखेर हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल जाहीर करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके आरोप काय?

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हसन मुश्रीफ यांनी काही गैरव्यवहार केले आहेत, असा आरोप करण्यात आला होता. हसन मुश्रीफ यांनी 2011 साली मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करुन स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पैसे जमा केले होते. जवळपास 38 कोटींपेक्षा जास्त रक्कम ती होती. या पैशांमध्ये साखर कारखाना सुरु करुन त्यांना शेअर्समध्ये सामावून घेण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. पण ते पैसे मुश्रीफांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले, असा आरोप करण्यात आला आहे.