मोदींचं सरकार कधीपर्यंत टिकेल?; शरद पवार यांची सर्वात मोठी भविष्यवाणी काय?

| Updated on: Jul 27, 2024 | 2:26 PM

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत हे दोन्ही नेते मोदींसोबत आहेत, तोपर्यंत मोदी सरकार केंद्रात स्थिर आहे, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

मोदींचं सरकार कधीपर्यंत टिकेल?; शरद पवार यांची सर्वात मोठी भविष्यवाणी काय?
Follow us on

एनडीएतील घटक पक्षांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं सरकार स्थापन केलं आहे. मोदी सत्तेत आल्यापासूनच केंद्र सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे सरकार औटघटकेचं राहणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. तर आमचं सरकार मजबूत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि देशातील बुर्जुर्ग नेते शरद पवार यांनी मोदी सरकारबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. मोदी किती काळापर्यंत सत्तेत राहू शकतात, याचं भाकीतच शरद पवार यांनी केलं आहे. आज मीडियाशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोदी सरकारच्या भवितव्यावर थेट भाष्य केलं आहे.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भजापने साथ घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील सरकारला स्थैर्य आलं आहे. हे दोन्ही पार्टनर मोदी सोबत आहेत, तोपर्यंत मोदींना अडचण नाही, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. गेली 10 वर्ष सर्व सत्ता मोदींच्या हातात होती. आता त्या सत्तेत वाटेकरी आले आहेत. वाटेकरी आल्याने त्याचा परिणाम दिसतो का? हे आम्ही पाहत आहोत. पूर्वी एका मुठीत ही सत्ता होती. आता ती अवस्था राहिली नाही, असा टोला शरदप पवार यांनी लगावला.

म्हणून चित्र बदललं

लोकसभा निवडणुकीवेळी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे भाजपच्या काही लोकांनी 400 जागा हव्या होत्या. त्यांनी 400 पारचा नारा दिला होता. का? तर त्यांना संविधानात बदल करायचा होता. भाजपचे एक हेगडे नावाचे मंत्री आहेत. त्यांनी जाहीरपणे संविधान बदलायचं आहे असं सांगितलं होतं. त्यांनीच नव्हे तर मोदींनीही अशीच भूमिका मांडली होती. त्यांचे इतर सहकारीही अशीच भूमिका घेत होते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे. त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकजुटीने मतदान केलं पाहिजे, असा विचार लोकांनी केला. त्यामुळे 400 वरून चित्र खाली आलं, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

लोकांना बदल हवाय

आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तीन एक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकांना बदल हवा असल्याचं दिसत आहे. आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. पण आपल्याला विधानसभा निवडणुकीत संधी आहे, असं लोकांना वाटतं. लोकसभेला आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.