Sharad Pawar : अजितदादांना पक्षात घेणार का ?; शरद पवार यांचं एका वाक्यात उत्तर काय ?

| Updated on: Jul 17, 2024 | 2:59 PM

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून फिरत आहेत. त्याकडे कसं बघता, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य करत स्पष्ट उत्तर दिलं. ते छापून आलंय याचा अर्थ त्यांच्यात अस्वस्थता आहे' असं पवार म्हणाले.

Sharad Pawar : अजितदादांना पक्षात घेणार का ?; शरद पवार यांचं एका वाक्यात उत्तर काय ?
शरद पवार आणि अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पुण्यात मीडियाशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील विश्लेषणापासून ते छगन भुजबळ यांच्याशी झालेल्या भेटीवर शरद पवार यांनी मनसोक्त भाष्य केलं. तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून विरोधकांनी भूमिका स्पष्ट करण्याची वारंवार मागणी केली जात आहे, त्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. यावेळी त्यांना पुन्हा एकदा अजित पवार यांच्या घरवापसीबाबत विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत नरो वा कुंजरोवा अशा पद्धतीने उत्तर देऊन काही पत्ते राखून ठेवले आहेत. त्यामुळे अजितदादांचं काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

शरद पवार यांना यावेळी अजितदादांसाठी घरात जागा आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, घरात सर्वांनाच जागा आहे, असं शरद पवार म्हमाले. तेव्हा, पक्षात अजितदादांना जागा असेल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावरही पवारांनी तात्काळ उत्तर दिलं. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार. घ्यायचं की नाही हे ते ठरवतील, असं शरद पवार यांनी स्पष्टच सांगून टाकलं.

याचा अर्थ काही तरी आहे…

हे सुद्धा वाचा

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. त्याकडे कसं बघता, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. मात्र ‘ तो महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे. आजच्या पेपरला बातमी वाचली. विवेक नावाचं साप्ताहिक आहे. त्यात ही बातमी आहे. त्या आधी ऑर्गनायझरमध्येही अशीच बातमी होती. विवेक आणि ऑर्गनायझरची विचारधारा कोणती? याचा शोध घ्यावा लागेल. यात ते छापून आलंय याचा अर्थ त्यांच्यात अस्वस्थता आहे, असं म्हणायला हरकत नाही,’ असं सूचक विधानही त्यांनी केलं.

घरातील उमेदवार असूनही सुप्रियाला मतदान होईल हे मला कळलं..

बारामती आहे. तिथे लोक काम करणारचं. तुमचा बारामतीतील लोकांशी वर्षानुवर्षाचा संवाद कसा आहे, हे महत्त्वाचं आहे. या निवडणुकीतच नाही तर अनेक निवडणुकीत मी बारामतीत फक्त फॉर्म भरायला जायचो. त्यानंतर थेट शेवटच्या सभेला जायचो. बाकीचा प्रचार करायला मी कधी गेलो नाही, यावेळचा अपवाद सोडला तर. त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे. लोकांशी पर्सनल संवाद ठेवला तर… पूर्वी 50 टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. मतदार आल्यावर त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखतो. हा जनरेशन गॅप आहे. पण हा संवाद ठेवला तर लोक विसरत नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

किस्सा काय?

यावेळी शरद पवार यांनी ते मुख्यमंत्री असतानाचा एक किस्साही सांगितला.  मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी कुणी तरी भेटायला आल्याची चिठ्ठी आली. मी त्या व्यक्तिला ऑफिसमध्ये पाठवायला सांगितलं. तेव्हा एकबाई आली. तिला म्हटलं काय सुमन काय चाललं? ती गावात गेल्यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारल्याचं गावात सांगत होती. काम होवो ना होवो पण साहेबांनी मला नावाने हाक मारली याचं लोकांना अप्रुप असतं. लोक हा सुसंवाद विसरत नाहीत, असं सांगतानाच मला खात्री होती की सुप्रियाला मतदान केल्याशिवाय बारामतीकर राहणार नाहीत. घरातील उमेदवार असूनही सुप्रियाला मतदान होईल हे मला माहीत होतं, असंही त्यांनी सांगितलं.

वर्षभरापूर्वी काय घडलं?

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि अजित पवारांसह पक्षातील अनेक महत्वाचे नेते महायुतीत गेले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. ही भूमिका फक्त राजकीय असती तर ठीक होतं, पण ते तेवढ्यापुरतचं राहिलं नाही, आणि सुरू झाले वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असे राष्ट्रवादीतले अनेक ज्येष्ठ नेतेही बाहेर पडले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही बारामतीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं केलं आणि पवार वि. पवार असा सामना रंगला.

लोकसभेत अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नाही आणि अनेक नेत्यांची घरवापसी ( शरद पवार गट ) सुरू झाली. छगन भुजबळ हेही महायुतीत खुश नसल्याचे, त्यांचा कोंडमारा होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत . त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली असून ते परत आले तर त्यांना जागा देणार का असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.