निफाड, नाशिक : बहुचर्चित असलेली नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचा निकाल अखेर हाती आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल दहा वर्षे एक हाती ग्राम पंचायतीवर सत्ता असलेल्या दिलीप बनकर यांच्या पुतण्याचा दारुण पराभव झाला आहे. दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांचा पराभव झाला असून ठाकरे गटाचे भास्कर बनकर थेट सरपंच पदी विजयी झाले आहे. याशिवाय दुसऱ्या स्थानावर भाजपचे सतीश मोरे हे होते. पिंपळगाव बसवंत ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल होते. त्यामध्ये सरपंचपदी निवडणूक रिंगणात असलेल्या सतीश मोरे यांनीही पॅनल बनवून निवडणुकीत रंगत आणली होती. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.
संपूर्ण निफाड तालुक्यासह जिल्ह्याचे पिंपळगाव बसवंत या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष लागून होते. त्यामध्ये आमदार बनकर यांचे पुतणे निवडणूक रिंगणात होते.
आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर, शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर बनकर आणि भाजपचे सतीश मोरे यांच्यात थेट सरपंच पदासाठी तिरंगी लढत होती.
गेल्या दहा वर्षांपासून पिंपळगाव बसवंत येथे आमदार दिलीप बनकर यांची निर्विवाद सत्ता होती, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गणेश बनकर यांच्या मातोश्री मागील पंचवार्षिकला सरपंच होत्या.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलचा झालेला हा पराभव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून पुतण्याचा पराभव झाल्याने बनकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.