भुसावळ : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कांदा, गहू, हरभरा आणि मूग आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे संकट तर दुसरीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः पिकावर नांगर फिरवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि ठाण्या पलीकडे पाहायला त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांना वेळ नाही अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ज्या संकटात कापूस उत्पादक सापडला आहे. त्या संकटातून कांदा उत्पादक यांची ते सुटका करू शकले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
तर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्त केले होते. त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकारमध्ये येण्यापूर्वी-आणि सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामध्ये फार मोठे अंतर पडले असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
शेतकरी आत्महत्या पूर्वी करत होते आणि आताही करता हे या प्रकारचे त्यांचे वक्तव्य म्हणजे अब्दुल सत्तारांनी एक प्रकारे शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करण्यासारखं आहे अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हे या सरकारकडून अपेक्षित असताना मात्र सरकारमधील मंत्रीच जर असं वक्तव्य करत असतील तरी अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची जाण असेल तर अब्दुल सत्तार त्यांच्याकडून खुलासा मागून घेतील आणि शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्य विषयी त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी मागणीही त्यांन यावेळी केली.