रक्षा बंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला होता. त्यावर मी राज्याच्या दौऱ्यावर आहे. वाटेत ज्या बहिणी भेटतील त्यांच्याकडून राखी बांधून घेईल. तिकडे सुप्रिया असेल तर तिला जाऊन भेटेल आणि राखी बांधेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही तुम्ही अजितदादांना राखी बांधणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जे उत्तर दिलं त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे पवार कुटुंबात अजूनही सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तुम्ही अजितदादांना राखी बांधणार आहात का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत त्रोटक उत्तर दिलं. आपल्या संस्कृतीत आधी लग्न कोंढाण्याचं आहे. आधी काम आणि नंतर काय साजरे करायचं ते करायचं. जे काही असेल ते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावर राखी बांधायला जाणार आणि नातं पाळणार, असं अजितदादा म्हणाले आहेत, असं सुप्रिया सुळे यांना सांगितलं असता, रामकृष्ण हरी म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. त्यांच्या या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार कुटुंबात अजूनही सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.
गलिच्छ राजकारण सुरू आहे
सुप्रिया सुळे यांनी आजच्या पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर ट्विट केलं होतं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किती गलिच्छ राजकारण सुरू आहे आणि काय पातळी या सरकारने गाठली आहे ते बघा. माझ्याकडे ज्या महिलांनी वेदना मांडल्या, त्याच मी तुम्हाला दिल्या आहेत. आपलं दुर्दैव आहे की हे लाडकी बहीण म्हणतात आणि लाडक्या बहिणीला धमकी देतात. हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे. सत्य जे आहे तेच मी मांडलं आहे. सरकार जर एखादी योजना देत असेल तर त्याच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा आग्रह कशाला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
अर्ज रद्द करून तर पाहा
हे सरकार एकदम असंवेदनशील आहे. केवळ मतांचं राजकारण करण्यासाठी यांनी योजना आणल्या आहेत. लोकसभेमध्ये बसलेला शॉक आणि आता विधानसभा आल्यात, त्यामुळेच केवळ मतांसाठीच या योजना आणल्या जात आहेत, असं सांगतानाच भाजपच्या खासदारांनीच म्हटलंय की मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ. अर्ज रद्द करू. त्यांना सांगते तुम्ही पैसे परत घेऊन तर बघा, असा इशाराच त्यांनी दिला.
कार्यक्रमाला यावं लागणार नाही
महिलांचे पैसे परत घेण्याची वेळ येणारच नाही. कारण आमचं सरकार ऑक्टोबरमध्ये आल्यावर कोणत्याही महिलेला कोणत्याही कार्यक्रमाला जबरदस्तीने यावं लागणार नाही. तिला धमकी देण्याची कुणाची हिंमत होणार नाही. आम्ही घरबसल्या तिला 1500 रुपये देऊ, असं त्या म्हणाल्या.