गृहमंत्री महोदय…. पुण्यात ट्राफिक हवालदाराला जाळण्याचा प्रयत्न, संतप्त सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

| Updated on: Jul 06, 2024 | 12:03 PM

पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

गृहमंत्री महोदय.... पुण्यात ट्राफिक हवालदाराला जाळण्याचा प्रयत्न, संतप्त सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
Follow us on

पोर्श कार अपघात, पबमध्ये ड्रग्स या सर्व घटनांमुळे सध्या पुण्याचं नाव भलतेच चर्चेत आहे. त्यातच काल ( शुक्रवार) रात्री पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मद्यधुंद इसमाने महिला ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपीला रोखलं आणि त्या महिला पोलिसाला वाचवल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी संजय फकिरा साळवे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेवरून शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आवाज उठवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे.

काय आहे सुप्रिया सुळे यांचं ट्विट ?

हे सुद्धा वाचा

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्ह ची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलीसांवर हात टाके पर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत. एकिकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून दुसरीकडे सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतोय ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलीसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. तेथे ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई सुरू होती. तेव्हा महिला पोलिसाने तेथे संजय याला अडवलं आणि त्याची चौकशी सुरू केली. मात्र तेवढ्यात त्याने महिला पोलिसावर पेट्रोल आणि रॉकेल टाकत तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा तिथे इतर पोलिस गस्तीला होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि सतर्कतने धाव घेत त्या आरोपीला रोखले आणि महिला पोलिसालाही वाचवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि महिला पोलिसाचाही जीव वाचला.

आरोपी संजय फकिरा साळवे याला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शहरात सध्या सर्वत्र ड्रिंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई सुरू असतानाच पोलिसांवर असा हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली आहे.