योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये दोनदा भेट झाली आहे. एमसीएच्या निवडणूक काळात आणि नंतर शरद पवार यांच्यावर शस्रक्रिया झाली त्यावेळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दोघांची भेट झाली होती. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमात काय घडामोडी घडतात शिंदे-पवार काय बोलतात याचीच राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
पुणे शहरालगत असलेल्या मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान काही पुरस्कारांचे वितरण केले जातं, यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना आणि शेतकऱ्यांना पुरस्काराचे वितरण केलं जातं.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला विशेष निमंत्रण दिले जातं आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण केले जाते.
राज्याच्या साखर उद्योगात महत्वाची भूमिका वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बजावत असते. याच संस्थेच्या माध्यमातून राज्यातील साखर उद्योगांना मार्गदर्शन आणि वेगवेगळे संशोधन केले जाते.
पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही साखर उद्योगासाठी महत्वाची संस्था आहे. वसंतदादा पाटील यांनी ही संस्था सुरू केली होती, नंतर त्यांच्याच नावाने ही संस्था करण्यात आली आहे.
सुरुवातीला शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन ऊस लागवड कशी करणे? ऊस उत्पादन घेतांना काय करावे लागते, त्यातील संशोधन आणि ऊस उत्पादनापासून केली जाणारे उत्पादने यावर वसंतदादा पाटील यांनी मोठं योगदान दिले आहे.