लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली. महायुतीनं पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष मिळून केवळ पन्नास जागाचं जिंकता आल्या, ज्यामध्ये काँग्रेला 16, शिवसेना ठाकरे गटाला 20 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात कमी 10 जागा मिळाल्या. दरम्यान नवं सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांकडून असा दावा केला जात आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत.
त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे भाजपच्या संपर्कात आहेत. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश माहजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यसाठी इच्छूक होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. अजित पवार गटात प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं की, देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाहीये. देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही? याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजत असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात, भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.