पुण्यातील वाघोली परिसरात रविवारी मध्यरात्री एक भयानक अघात झाला. रस्त्याच्या कडेला फूटपाथर झोपलेल्या काही व्यक्तींना एका डंपर चालकाने निर्घृणपणे चिरडलं. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उचपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे पुण्याच एकच खळबळ माजली असून तिघांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फूटपाथवर झोपलेले हे सर्व मूळचे अमरावतीचे असून कामाचा शोधात ते पुण्यात आले होते. रात्री झोपण्यासाठी, पाठ टेकण्यासाठी त्यांनी फूटपाथचा आसरा घेतला होता, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडण्यापूर्वी, रात्री झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातामुळे राज्यभरातील हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, रोहित वार यांनीही दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्क केलं आहे. X या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहून त्यांनी त्यांचा उद्वेगही व्यक्त केलाय. ‘ ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही? ‘ असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट ?
तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही.. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे, वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरुय.. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का? सकाळी सकाळी ही बातमी पाहून मन सुन्न झालं.. ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही?
यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले कामगार लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! सरकारने पिडीत कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी ही विनंती.🙏
असे रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीत सरकारला सवाल केले आहेत, तसेच भरपाई देण्याची विनंतीही केली आहे.
तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही.. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2024
जखमी आणि मृतांची नावं
रविवारी रात्री झालेल्या या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष), वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष) अशी तिघांची नावं आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय 21), रिनिशा विनोद पवार (वय 18), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय 27), दर्शन संजय वैराळ (वय 18) आलिशा विनोद पवार (वय 47) अशी 6 जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.