बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. याप्रकरणी अद्याप सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यातच काल मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी झाले होते. ते स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. “माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार”, असा पावित्रा धनंजय देशमुख यांनी घेतला आहे. आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राज्य सरकारवर टीका करत घणाघाती आरोप केले आहेत. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं, असे रोहित पवार यांनी म्हटले.
मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं, अशा शब्दात रोहित पवारांनी टीका केली.
राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या, असेही रोहित पवार म्हणाले.
मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 13, 2025
दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोर्चा काढण्यात येत होता. यानतंर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास दोन तासांपासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला.