Sharad Pawar Sister Saroj Patil Speech : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या भगिनी आणि एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी बारामतीत एक सभा घेतली. या सभेत त्यांनी खणखणीत भाषण केले. यावेळी भर सभेत सरोज पाटील यांनी कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफांना पाडायचं असं आवाहन केले. “भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोकं आहेत”, असे सरोज पाटील म्हणाल्या.
बारामतीत डॉ. विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरोज पाटील यांनी भाषण केले. त्यावेळी प्रतिभा पवार, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते. शरद हा माझ्यापेक्षा लहान आहे. त्याची तब्येत बरी नाही. शरद पायाला भिंगरी लावून फिरतो त्याचं वाईट वाटतं. मी घरी कशी बसू? कोल्हापूरमध्ये आमचे सगळे लोकं येणार आहेत. मला फक्त मुश्रीफला पडायचं आहे, असे मोठे विधान शरद पवार यांच्या बहीण आणि एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी केले.
शरद पवार हा माझ्यापेक्षा लहान आहे. त्याची तब्येत बरी नाही. तरी तो एवढा फिरतो आणि आपण घरी कसं बसायचं, माझ्यातही ताकद नाही. पण मी कोल्हापूरमध्ये फिरते. मला खात्री आहे की, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये जयंत पाटील, विश्वजीत कदम, समरजीत घाटगे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. मला फक्त हसन मुश्रीफांना पाडायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, असे सरोज पाटील म्हणाल्या.
सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाचपडत आहे. प्रतिगामी शक्ती डोकेवर काढत आहेत, हे पाहून अतिशय वेदना होतात. माझा महाराष्ट्र कसा होता आणि आज काय परिस्थिती झाली आहे. यामुळे मला रात्रभर झोप येत नाही. भाजपची ही विषवल्ली मुळासकट उपटली पाहिजे. तुम्ही तुमच्या तरुण मुलांकडे लक्ष द्या. भिड्यांच्या कळपात तर जात नाहीत ना हे बघा.. तो मुलांना चैनीला पैसे देतो.. दारू देतो. आणि प्रचार कर म्हणतो.. आपली तरुण मुले त्याच्या कळपात सापडत आहेत, असेही सरोज पाटील यांनी म्हटले.
“आईने पोरांवर लक्ष ठेवले पाहिजे. भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोकं आहेत. आपली तरुण मुले त्याच्या कळपात सापडत आहेत. लोकशाही टिकवा, भटा ब्राह्मण यांच्या नादाला लागू नका. गाण्यापासून बोध घ्या आणि भाजपला चिरडून टाका”, असे सरोज पाटील म्हणाल्या.