सांगली : 28 सप्टेंबर 2023 | गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे. गणेशाकडे पार्थना केली की महाराष्ट्रावरील दुष्काळाचे जे सावट आहे ते दुर होऊ दे. पाण्याचे साठे सुधारले असतील हीच अपेक्षा. जुलैपर्यंत आपणाला तोंड द्यायचे आहे. परतीच्या पावसाने दिलासा दिला असला तरी अन्य संकटे आहेत. महागाईचे संकट आहे. देश प्रगतीपथावर यावा. देशातील सामान्य लोकांना चांगली संधी मिळावी, सुबत्ता मिळावी अशी प्रार्थना केली, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. पक्षावर नाव आणि चिन्ह हे जे संकट आलेलं आहे हे कृत्रिम संकट आहे.
रोहित पवार यांच्या कारखान्याच्या नोटीस आल्या आहेत. त्याबाबत अधिक पार्श्वभूमी माहित नाही. जर नोटीस दिली असेल तर त्याला ७२ तासात उत्तर देता येईल. कारखाना सुरु होण्यासाठी अजून वेळ आहे. आवश्यक असणारे नॉर्म्स रोहत पवार पाळतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच फार चिंता करण्याचे कारण नाही असे ते म्हणाले.
रमेश कदम आणि भुजबळ यांची काही चर्चा झाली असेल तर मला माहित नाही. पण, पवारसाहेब चुकीच्या पद्धतीचा दबाव स्वीकारत नाही. मात्र, आवश्यक असेल ते करतात. भुजबळ आमचे सहकारी होते. ते बाहेर यावे यासाठी आमचे प्रयत्न कायम होते. तुरुंगात जाऊन खासदार सुप्रिया सुळे त्यांना जाऊन भेटल्या होत्या. उद्देश हाच की त्यातून त्यांची सुटका व्हावी. हा आमचा सर्वांचा प्रयत्न होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुलुंड येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. मराठी भाषिक म्हणून जर जागा नाकारली जात असेल तर मुंबईकरांना त्याचे दुख होत असेल. अशी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार केला पाहिजे. समाज, जात, धर्म, भाषा यावर अवलंबून असणाऱ्या लोकांनी एकत्र राहणे हे थांबले पाहिजे.
मराठी भाषिक आहेत म्हणून त्यांना नाकारले जात असेल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती राहत असेल तर त्याचा बंदोबस्त करायलाच लागेल. १०५ जणांच्या बलिदानामुळे मुंबई मिळाली आहे. मुंबईकडे पाहण्याची ज्याची वक्रदृष्टी असेल तर आम्ही पुढाकार घेऊन तो मोडून काढूच, पण, सरकारनेदेखील पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले.