अर्ध्यावरती डाव मोडला…. महाराष्ट्रात वर्षभरात सर्वाधिक लोकांनी संपवलं आयुष्य !

| Updated on: Dec 05, 2023 | 9:52 AM

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2022 सालासाठी वार्षिक रिपोर्ट जाहीर केला आहे. वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक लोकांनी आयुष्य संपवल्याचं या अहवालातून समोर आले आहे.

अर्ध्यावरती डाव मोडला.... महाराष्ट्रात वर्षभरात सर्वाधिक लोकांनी संपवलं आयुष्य !
Follow us on

मुंबई | 5 डिसेंबर 2023 : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2022 सालासाठी वार्षिक रिपोर्ट जाहीर केला आहे. भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या ताज्या अहवालानुसार, 2021 सालच्या तुलनेत 2022 मध्ये जास्त आत्महत्या झाल्या आहेत. 2021 साली हा आकडा 1,64,033 इतका होता मात्र 2022 तो वाढून 1,70,924 इतका झाला. मात्र एनसीआरबीच्या या अहवालातून राज्यासाठी लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे. वर्षभरात राज्यात सर्वाधिक लोकांनी आयुष्य संपवल्याचं या अहवालातून समोर आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक लोकांनी संपवलं आयुष्य

वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 22 हजार 746 आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 19,834 लोकांनी आत्महत्या केली. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचा नंबर लागतो.  2022 मध्ये भारतात दर तासाला 19 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्यांमध्ये रोजंदारी मजुरांचा प्रमाण सर्वाधिक 26.4 टक्के इतके होते तर गृहिणींचे प्रमाण 14.8 टक्के इतके आहे.

कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकल्यामुळे आणि दिवाळखोरीमुळे आयुष्य संपवणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 1941 आत्महत्या , त्यानंतर कर्नाटकात 1335 आणि आंध्र प्रदेशात 815 आत्महत्या झाल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालातून राज्यातील लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.

कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक

महाराष्ट्रात अनेक लोकांनी आयुष्य संपवलं. त्यापैकी अनेकांनी बेरोजगारी तसेच गरिबीमुळेही हे टोकाचं पाऊल उचललं. राज्यात बेरोजगारीमुळे 642, गरिबीमुळे 402 आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे 640 नागरीकांनी त्यांच्या आयुष्याचा शेवट केला. मात्र राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास 6 हजार 961 लोकांनी आयुष्य संपवलं. तसेच महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी 49.3 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर कोणतं ?

दरम्यान एनसीआरबीच्या रिपोर्टमधून महिलांसाठी सर्वात असुरक्षित असलेल्या शहराचे नावही जाहीर झाले आहे. राजधानी दिल्ली हे त्याचं नावं. दिल्लीमध्ये 2022 साली 1,204 अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. त्याशिवाय याप्रकरणी देशभरात महिलांविरोधात झालेल्या अत्याचाराचे प्रमाण 31.20 टक्के होते. त्यानुसार, दिल्लीत दरदिवशी साधारणपणे तीन अत्याचाराची प्रकरणं समोर आली आहेत. एनसीआरबीच्या या रिपोर्टमध्ये 19 महानगर शहरांमधील रिपोर्ट केल्या गेलेल्या 48 हजार 755 प्रकरणांचा उल्लेख आहे. त्यात दिल्लीमध्ये सर्वाधिक 14,158 प्रकरणं समोर आली आहेत. तर त्यानंतर मुंबईत 6,176 गुन्ह्यांची नोंद झाली.