नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची (Nashik Farmer) अर्थवाहिनी म्हणून कधीकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची (NDCC) ओळख होती. नंतर या बँकेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठ्या कर्जदारांना पत नसतांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याची वसूली न करता बँकेचे कर्मचारी हे लहान कर्जदार शेतकऱ्यांकडे वसूलीचा दगादा लावत आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे थकबाकीदार संचालकांना सोडून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा नवा धंदा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. हीच बाब पालकमंत्री दादा भुसे यांनी घेरली असून विशेष चौकशी (SIT) केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे थकबाकीदार संचालक यांचे धाबे चांगलेच दणाणले असून जिल्हा बँकेच्या वर्तुळात मोठी चर्चा आहे.
नाशिक जिल्ह्यातील कधीकाळी अर्थवाहिनी असलेल्या एनडीसीसी बँकेची एसआयटी चौकशी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक सुरू असून थकबाकीदार संचालकांना सोडून लहान-लहान शेतकऱ्यांना बँकेचे कर्मचारी वेठीस धरत आहे.
कर्ज लाटणाऱ्या कर्जदारांकडून सक्तीने वसूली करण्याऐवजी शेतकऱ्यांना वेठीस धरून जमीन आणि ट्रॅक्टर लाटण्याचा प्रकार भुसे यांच्या निदर्शनास आला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत आढावा घेत असतांना संचालकांच्या 16 कोटीचा मुद्दा देखील समोर आणला असून त्याच्या वसुलीचे काय ? असा सवाल बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेला शासनाने बँकेला ९२० कोटी रुपये दिले होते. त्यात 30 ते 35 कोटी रुपयेच शेतकऱ्यांना वाटल्याचे समोर आले आहे.
एकूणच जिल्हा बँकेतील गैरकारभाराची चौकशी आता केली जाणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.